नंदुरबार l प्रतिनिधी
आई वडील हेच प्रथम गुरु असतात म्हणून मुलांवर चांगल्या संस्कारासाठी नैतिकता, मूल्य रुजवा. त्याचबरोबर राजयोगातून आत्मा परमात्म्याशी जोडले जातात. असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या बी.के. वर्षादीदी यांनी केले.
नंदुरबार शहरातील बालवीर चौकालगत असलेल्या निर्माणाधीन पिंपळेश्वर महादेव आणि हनुमान मंदिरातर्फे मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अध्यात्मिक प्रबोधन आणि भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या बी.के. योगिता दीदी यांनी सांगितले की, स्वपरिवर्तन झाल्यास विश्व परिवर्तन होते. स्वतःमधील चांगले गुण शोधा .ओम शांती परिवारातर्फे विद्यार्थ्यांसह माता-भगिनींना अध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात येते याचा लाभ घेण्याचे आवाहन बी.के. योगिता दिदि यांनी केले.
यावेळी रवी पाटील यांनी अहिराणी व मराठी भावगीते सादर केली.परिसरातील उपस्थित महिला भगिनी तसेच तरुणींनी धार्मिक गीतांवर ठेका धरत आनंद लुटला.महाप्रसादाच्या वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे संयोजन पिंपळेश्वर महादेव मंदिर समितीच्या युवकांनी केले.








