नवापूर l प्रतिनिधी
शहरात वारंवार चोरी झालेल्या गोधनांचा शोध घेऊन तस्करी करणाऱ्यांवर कडक शासन होणे बाबतचे निवेदन विश्व हिंदु परिषद नवापूर प्रखंड तर्फे तहसिलदार मंदार कुलकर्णी व पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना दिले.
विश्व हिंदु परिषद सर्व पदधिकारी नवापूर नगरपालिका जवळ एकत्र येऊन निवेदन दिले. या निवेदना मध्ये म्हटले आहे की, सोमवार दि. २६ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे २.५१ मिनिटांनी राहुल दुसाणे यांच्या दोन पाळीव गोधन रात्री शहरातील मध्यवर्ती परिसर शास्त्रीनगर येथील गणपती बसवित असलेल्या ठिकाणावरुन रात्री एक इनोव्हा गाडी आली व त्या गाडीत गायींना भरुन घेऊन गेले बाबत सी.सी.टी.व्ही. फुटेज मध्ये नोंद आहे व ही घटना रात्री २.५१ वाजेला झालेली आहे.
तरी या चोरीबद्दल सकाळी तात्काळ नवापूर पोलीस स्टेशन येथे लेखी फिर्याद देण्यात आली आहे. शहरामध्ये अवैद्य गोमास विक्रीसाठी वारंवार अशा चोऱ्या होत आहे व शहरातील विविध नागरिक व संघटनांनी वारंवार निवेदन व मौखिक तक्रार केल्या आहेत. परंतु, नवापूर शहरात ही भरवस्तीत झालेली घटना अतिशय निंदनिय असून याबाबत रात्री पोलीसांची गस्त असल्यावर व सदर घटनास्थळ हे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असून देखील अशा घटना घडत आहेत.चोरी करणारी टोळी अत्यंत आधुनिक वाहने व शस्त्र घेऊन अशा चोऱ्या करीत आहेत. म्हणजे ही चोरांची टोळी अत्यंत व्यावसायिक असून सुयंत्रणेने ह्या चोऱ्या घडत आहेत व हे एक मोठे शडयंत्र आहे. जर इतक्या सुनियोजित पध्दतीने चोऱ्या होत असतील तर याला जबाबदार कोण? हा देखील प्रश्न निर्माण होत आहे.
नवापूर शहरात मोठ्या प्रमाणावर गोधनची तस्करी होत आहे परंतु,पोलीस प्रशासन याबाबतीत निष्क्रिय असून यावर काहीही कार्यवाही झालेली नसल्याचे निदर्शनास येत आहे. सदर घटना गंभीर असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जनतेची आस्था गोमाता विषयी असून जर या चोऱ्यांचा उलगडा व आरोपींचा शोध वेळेवर न झाल्यास व या घटनांवर वेळीच आळा न घातल्यास शहरातील नागरिकांची मानसिकता बिघडू शकते. तरी सदर घटनेचा सखोल तपास करण्यात यावा या चोरी करणाऱ्या टोळीस शोध घेऊन कडक कार्यवाही करण्यात यावी व अशा घटना भविष्यात घडणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घ्यावी व रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यात यावी आणि चोरी झालेले गोधन परत मिळवून द्यावे व गुन्हेगारांना कडक शासन व्हावे याबाबत आम्ही आपणास विनंती करीत आहोत अन्यथा विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व गोरक्षा सेवा समिती, नवापूर यांच्या वतीने जनआंदोलन, रास्तारोको आंदोलन हे संविधानिक मार्गाने करु व यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील याची कृपया नोंद घ्यावी.
निवेदनावर.विश्व हिंदु परिषदचे जिल्हासह मंञी शाम गावीत,राजेंद्र गावीत,जितेंद्र अहिरे,संदिप पाटील,मनोज बोरसे,दर्शन पाटील,नगरसेवक विशाल सांगळे,राहुल मराठे,कृणाल दुसाने,विकी चौधरी,आबा मोरे,रामकृष्ण गिरासे, वैभव सोनार,पंकज सुर्यवंशी,हेमंत शर्मा,गोपी सैन,सागर टिभे,शंभु सोनार सह सर्व विश्व हिंदु परिषदचे पदधिकारी यांच्या सह्या आहेत.








