नंदुरबार l प्रतिनिधी
ग्रामविकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करून आराखड्यात विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास गावे आदर्श होतील. त्यासाठी सर्व नवनिर्वाचित सरपंचांनी गावातील विकासकामे करावीत असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले .
जिल्हा परिषद आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मानमोड्या तालुका शहादा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या .राज्य व केंद्र शासनामार्फत विविध योजना ग्राम स्तरावर राबविल्या जातात .यात वैयक्तिक व सार्वजनिक योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळतो . परंतु या योजना राबविताना अनेक अडचणी असतात .या अडचणी सर्वसामान्य माणसांना शासनस्तरावर मांडता यावे व त्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी जिल्हा परिषदेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यात जिल्हा व पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागांचे अधिकारी ग्रामपंचायत स्तरावर उपस्थित राहून विविध योजनांविषयी माहिती देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावित यांनी यावेळी सांगितले .
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार ,सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल टाटिया ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी( नरेगा )नंदकिशोर सूर्यवंशी , शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे , बाल विकास प्रकल्प अधिकारी रणजीत कुरे , सरपंच देवीसिंग पावरा., पंचायत समिती सदस्य गोपी पावरा , प्रकाश पावरा अनिल भामरे , राजु पावरा आदींसह परिसरातील 31 ग्रामपंचायतींचे सरपंच , उपसरपंच उपस्थित होते .

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी यांनी उपस्थित सरपंच तसेच ग्रामस्थांना ग्रामविकासात ग्रामपंचायतीचा ग्रामविकास आराखडा तयार करताना कोणकोणत्या बाबींचा आराखड्यात समावेश व्हावा .तसेच शासनामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणास सरपंचांनी उपस्थित राहणे महत्त्वाचे असून यामुळे शासनाच्या विविध योजना ग्राम स्तरावर राबवितांना कसा फायदा होतो याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाविषयी मार्गदर्शन केले .उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी कृषी विभाग व रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजनांची सविस्तर माहिती देऊन त्यासाठी अर्ज कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले .बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी रणजीत कुरे यांनी कुपोषण मुक्तीसाठी महिला बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.. यावेळी उपस्थित सरपंचांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली .
प्रारंभी अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित यांचे ग्रामस्थांनी औक्षण करून स्वागत केले . यानंतर डॉ . गावित यांनी प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला कार्यक्रमास मलगाव , भुलाने ,असलोद , मंदाणा , डोंगरगाव , दुधखेडा , लंगडी ,वडगाव , शहाणा , चिरखान , अंबापुर , नागझिरी , जाम , कोंडावळ , बामखेडा ,आदींसह परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य , पंचायत समिती स्तरावरील अधिकारी तसेच मानमोडे गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.








