नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यांतील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीत १५ संचालकांसाठी दि २४ शनिवारी मतदान प्रक्रिया मतपत्रीकेव्दारे पार पडली.निवडणुकीत ५३.९६ टक्के मतदान झाले. निवडणूक शेतकरी विकास पॅनल व परिवर्तन पॅनल मध्ये सरळ लढत झाल्याचे चित्र दिसून आले.

नवापुर येथील वनिता विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदार यादीतील एक गट सोडून दुसऱ्या गटात नाव गेल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला होता वेळीच उमेदवार आणि अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सुरळीत मतदान सुरू केले.नवापूर,नंदुरबार विसरवाडी,खांडबारा या सर्वच मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजेपासून सुरुवात झाली होती.थंडीचे वातावरण असताना देखील मतदारांनी सकाळपासूनच उत्साह दाखवल्याने मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत होता.
नवागाव मतदान केंद्रावर माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक व आ. शिरीषकुमार नाईक यांनी तर जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावित व जि. प. सभापती सौ.संगीता गावित यांनी नवापूर मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
नंदुरबार,नवागाव, खांडबारा मतदान केंद्रावर देखील वयोवृद्ध मतदार करताना दिसून आलेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक ज्ञानेशवर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कारखाना स्थापनेपासून पाच वेळा बिनविरोध झाली होती. मात्र आता सहावी पंचवार्षिक निवडणुकीत मतदान घेण्यात आले.

१७ पैकी शेतकरी विकास पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत तर १५ जागांसाठी मतदान झाले. आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित व भरत माणिकराव गावित निवडणुकीत दोन गावित परिवार एकत्रित आले आहेत त्यांचे परिवर्तन पॅनलने निवडणुकीत कंबर कसले होते. तर माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र आ. शिरीशकुमार नाईक यांनी सर्व ताकद लावून सत्ता कायम राहण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत गावित आणि नाईक परिवार आमने-सामने उभे असून सत्ता कोण काबीज करतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.संपुर्ण निवडणुकीवर निवडणुक निर्णन अधिकारी तथा जिल्हा सहायक निर्बध अधिकारी भारती ठाकुर, सहायक निवडणुक अधिकारी निरज चौधरी,क्षेञीय अधिकारी सचिन खैरणार,शितल महाले,शरद चौधरी आदी लक्ष ठेऊन होते.
एकूण ९ हजार ७१७ मतदारांपैकी ५ हजार २४४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
यात नवापूर केंद्रावर २ हजार २५३ पैकी १ हजार २४९ मतदारांनी,नवागाव केंद्रावर २ हजार ३२५ पैकी १ हजार २५० मतदारांनी ,विसरवाडी केंद्रावर २ हजार ६७८ पैकी १ हजार ५४१ मतदारांनी,खांडबारा केंद्रावर १ हजार ७१४ पैकी ७९३ मतदारांनी तर नंदुरबार केंद्रावर ७४७ पैकी ४११ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
२५ डिसेंबर रविवारी सार्वजिक गुजराथी हायस्कुल येथे सकाळी साडेआठ पासुन मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहीती सहायक निवडणुक अधिकारी निरज चौधरी यांनी दिली आहे.








