खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय अनुदानित आश्रम शाळा वालंबा येथील विद्यार्थ्याचा शाळे समोरील रस्त्यावर दुचाकीने जबर ठोस दिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत स्थित असलेल्या देव मोगरा पुनर्वसन गावाजवळ अति दुर्गम भागातील वालंबा येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळा स्थलांतरित झाली असून या आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणारा नऊ वर्षीय विद्यार्थी मदन रमेश पाडवी हा 20 डिसेंबर रोजी संध्याकाळचे आपले जेवण आटोपून सुमारे साडेसहा वाजेच्या दरम्यान जवळील रस्त्यावर पायी जात असताना अक्कलकुवा कडून मुलगी कडे जाणाऱ्या भरधाव वेगातील दुचाकी (क्र. एम. एच. 39, ए.एल.32 82) यावरील दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकी (क्र. एम. एच.39 पी 27 53) हिला ठोस दिल्याने रस्त्याच्या कडेला पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यावर धडकल्याने या विद्यार्थ्याला जबर ठोस देऊन गंभीर जखमी केले.
या विद्यार्थ्याला अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच या विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला.या विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले मयत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आश्रम शाळा प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आपल्या मुलाच्या मृतदेह अंतिम विधीसाठी घेण्यास नकार दिला असता पालकांची समजूत काढून संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या विद्यार्थ्याच्या मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला वडील रमेश सिंगा पाडवी यांचा एकुलता एक मुलगा असल्याने मुलाच्या अचानकपणे अपघाती मृत्यू झाल्याने पालकांनी हंबरडा फोडला होता मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे असून पुढील तपास फौजदार जितेंद्र महाजन करीत आहेत.
सदर आश्रमशाळा अक्कलकुवा ते मोलगी रस्त्याच्या लगत असून या रस्त्यावर मोठी वाहतूक असते यापूर्वी देखील एका विद्यार्थ्याच्या अपघात होऊन पायाला इजा झाली होती काल झालेल्या अपघातात आठ वर्षीय बालकाच्या अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने या आश्रम शाळेला संरक्षण भिंत बांधून विद्यार्थ्यांना संरक्षण द्यावे अशी संतप्त मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. आश्रमशाळा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाहक विद्यार्थ्यांच्या जीव गेल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.








