नंदुरबार l प्रतिनिधी
खांडबारा विसरवाडी दरम्यान वडदा गावाजवळ रात्रीच्या अंधारात गुरे घेऊन जाणारे पिकअप वाहन व आयशर टेम्पोत समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघातात एक जण ठार, तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा विसरवाडी राज्य महामार्गावरील वडदा गावाजवळ. रात्री गुरे घेऊन जाणारे पिकप वाहन ( क्र.MH 04 EY 4565) व भंगाराचे सामान घेऊन जाणारा आयशर टेम्पो (क्र. MH.18 BG 8805) या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिकप वाहनाचे जवळपास तीन ते चार तुकडे झालेले आहे. पिकप वाहनामध्ये नऊ गायी व वासरे पाय आणि तोंड बांधून अत्यंत क्रूर पद्धतीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. अपघात एवढा भीषण होता की पिकअप वाहन चालक जागीच ठार झाला आहे. तर पाच ते सहा गायी देखील मृत्युमुखी पडल्या आहे. इतर गायी गंभीर जखमी झाल्या आहे. पिकप सहचालक सलमान मोहम्मद व आयशर टेम्पो मधील चालक सुनील साळुंखे, सहचालक राजेंद्र शांतीलाल पवार, हे तीन जण गंभीर जखमी झाले आहे.
अपघात होताच वडदा गावातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. विसरवाडी 108 रुग्णवाहिकेचे पायलट मानसिंग गावित, डॉक्टर प्रवीण गावित, व खांडबारा ग्रामीण रुग्णालय 108 रुग्णवाहिकेचे पायलट हरीश गावित, डॉक्टर पंकज अहिराव यांना कॉल येताच घटनास्थळी धाव घेऊन जखमींना प्राथमिक उपचार देऊन नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
रात्रीच्या अंधारात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या मुक्या जनावरांना मानवी बुद्धीला पटणार नाही अशा क्रुर पद्धतीने. तोंड व पाय बांधून त्यांच्यावर पुन्हा भंगाराचा सामान लादून भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहनाचा वडदा गावाजवळ आयशर टेम्पोच्या धडकेत भीषण अपघात होऊन चालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व खांडबारा पोलीस चौकीतील कर्मचारी पोलिस नाईक नीलेश दहिफडे, पोलिस नाईक राजू कोकणी, पोलिस कॉन्स्टेबल देवेंद्र हिरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण अहिरे, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश अहिरे, गणेश कोकणी, सनी नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचे कार्य केलं. वडदा गावातील ग्रामस्थांनीही अपघातातील जखमी गायी व चालकांना तत्काळ मदत करून उपचारासाठी पाठवले. तसेच रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून महामार्ग वाहनांसाठी खुला केला. अतिशय गंभीर प्रकारे झालेल्या अपघाताचा अधिक तपास विसरवाडी पोलीस करत आहे.








