सारंगखेडा l प्रतिनिधी
चारशे वर्षाची परंपरा असलेला सारंगखेडा येथील एकमुखी दत्त प्रभूंच्या यात्रोत्सवाला दोन वर्षाचा खंडानंतर यंदा भरणार आहे .गतवर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे अश्व बाजाराला परवानगी मिळाली होती . यंदाही अश्व बाजाराची तयारी पुर्ण झाल आहे . अश्व बाजारात अश्व दाखल झाले आहेत , आता थंडीच्या गारव्यात घोड्यांचा टापांचा आवाज परिसरात निनादू लागला आहे .
जातीवंत घोडयांच्या बाजारासाठी देशभर प्रसिध्द असलेल्या येथील एकमुखी दत्त प्रभुंची यात्रोत्सवाला ८ डिसेंबर पासून सुरु होत आहे . टेंभा रस्त्यावरील गोवर्धनभाई मैदानावरील ३० एकर क्षेत्रात अश्व बाजार सजविला गेला आहे. देशाच्या विविध प्रांतातून दोन दिवसात आठराशेहून अधिक अश्व येथे दाखल झाले आहेत .विविध राज्यांतील उमदे व देखणे घोडे हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते . काही वर्षापासून सुरु असलेल्या चेतक फेस्टिव्हलमुळे यात्रा ग्लोबल झाली आहे . त्यातून अश्व विक्रेत्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे . महत्वाचे म्हणजे फेस्टिव्हलमुळे हिवाळी पर्यटनस्थळ म्हणून सारंगखेडा पुढे येत आहे . ग्रामीण कला , संस्कृती आणि शेती अर्थव्यवस्थेला चालना देणारा उत्सव म्हणून या यात्रेकडे पाहीले जात आहे . फेस्टिव्हल अंतर्गत घोडयांच्या स्पर्धा शर्यत घेण्यात येत आहे .
गोवर्धनभाई मैदान सजले
यात्रा काळात दोन ते अडीच हजार अश्व येथे येतात . त्यांना राहण्यासाठी व खरेदी .विक्रीसाठी गोवर्धनभाई मैदानावर ३० एकर क्षेत्रावर मंडपाची उभारणी करण्यात आली आहे . घोडे निरीक्षकांसाठी बॅरिकेट्स , पुरेशी वीज , पाणी , आरोग्य सुविधा , चारा आदी व्यवस्था करण्यात येत आहे . या बाजारात वाहनांना प्रवेश करता येणार नाही . रोज परिसराची स्वच्छता करण्यात येईल असे नियोजन करण्यात आले आहे . धुळ उडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत . घोड्यांच्या रायडिंगसाठी विशेष जागा उपलब्ध करण्यात आली आहे .
अश्व बाजाराचा लौकिक वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो . यावर्षी घोडयांच्या खरेदी .विक्रीचा व्यवहार रात्रीही करण्यात येणार आहे . त्यासाठी दिव्यांच्या लखलखाटाने यात्रा उजळून निघणार आहे . त्यातच अनेक खरेदीदारांना रात्री पहाटेही घोडयांची पसंती करून खरेदीचा व्यवहार पूर्ण करता येणार आहे . रोषणाईमुळे घोडे पाहण्यासाठी रात्रीची वेळही अनुकूल ठरणार आहे . आज दत्त जयंतीनिमित्त रात्री एक मुखी दत्ताची पालखी निघणार आहे एकाच वेळी दहा हजाराहून अधिक भाविक आरतीला उपस्थित राहणार आहेत