नंदुरबार | प्रतिनिधी-
दिल्लीतील श्रद्धाची हत्या करणार्या आफताबमुळे, लव्ह जिहादच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली, समाजमन हळहळले आहे. या घटनेमुळे सर्वांनी धडा घेतला पाहिजे, असे आवाहन करतांनाच उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही लवजिहादचा कायदा करावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केली.
नंदुरबार जिल्हा संघटनात्मक दौर्यावर चित्रा वाघ या आल्या आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या निवासस्थानी असलेल्या भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती वाघ बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, भारतीय कायद्यानुसार १८ वर्षानंतर युवती स्वतंत्र विचार करतात. परंतु त्यांनी आपल्या आई वडिलांचा विचार केला पाहिजे. या घटनेमुळे कोणावर विश्वास ठेवला पाहिजे? हे तरुणींना समजले पाहिजे.
प्रेमामध्ये वेड्या होऊन भलतेच पाऊल उचलले जाते. आई वडिलांनी देखील घरातल्या मुलांना वेळ दिला पाहिजे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर लव जिहादविरोधी कायदा व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, निलेश माळी आदी उपस्थित होते.