नंदुरबार l
नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावरील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरास दुचाकीने आलेल्या चौघांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल व रोकड असा सुमारे २३ हजाराचा ऐवज लांबवून नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील धनराट येथील पाऊल धनाजी गावित हे नवापूर शहराजवळील नवापूर ते पिंपळनेर रस्त्याने दुचाकीने नांदवन येथे जात होते. यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात पाऊल गावित यांना अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेला ७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व १५ हजार ६३० रुपयांची रोकड असा एकूण २३ हजार ६३० रुपयांचा ऐवज लांबवून चौघे अनोळखी दुचाकीने पसार झाले.
याबाबत पाऊल गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात चौघा अनोळखी इसमांविरोधात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.