नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या 16 सप्टेंबर, 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार 58 सेवा फेसलेस पद्धतीने नागरिकांना देण्याचे निर्देश दिले आहे. यापैकी 9 सेवा यापूर्वीच नागरिकांना फेसलेस पद्धतीने देण्यात येत आहेत. यात अजून 4 सेवांची वाढ झाली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
नव्याने फेसलेस पद्धतीने देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये अनुज्ञप्तीमध्ये मोबाईल नंबर अद्यावत करणे, अनुज्ञप्तीची माहिती मिळविणे (DL Extract), दुय्यम कंडक्टर अनुज्ञप्ती, कंडक्टर अनुज्ञप्तीचे नूतणीकरण या चार सेवांचा समावेश आहे. या चार फेसलेस सेवा नागरिकांच्या आधार क्रमांकाचा वापर करून देण्यात येणार असल्याने यापुढे नागरिकांना परिवहन कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.बिडकर यांनी केले आहे.