नंदुरबार l प्रतिनिधी
गवळी समाजासह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणाऱ्या श्री काशिनाथ बाबा मंदिरावर आज कार्तिक अमावस्या निमित्त नवसपुर्तीसाठी भाविकांनी गर्दी केली होती.
प्रतिवर्षी कार्तिक अमावस्या निमित्त धुळे रस्त्यावरील ज्ञानदीप सोसायटीच्या टेकडीवर श्री काशिनाथ बाबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.सन 1970 पासून टेकडीवर बांधण्यात आलेल्या श्री काशिनाथ बाबा मंदिराचे असंख्य भाविक आहेत.मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल अनेक भाविकांनी केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी बुधवारी भाविक मंदिरावर दाखल झाले होते.
सर्वप्रथम बालवीर चौकातून कलशधारी सुहासिनीसह मिरवणूक काढण्यात आली.वाचत गाजत निघालेल्या मिरवणुकीत ध्वजाचे मानकरी काशिनाथ हिरणवाळे होते.बालवीर चौक, दादा गणपती, देसाईपुरा, मोठा मारुती मंदिर, धुळे नाका, वाघेश्वरी चौफुली, गोपाल नगर, ज्ञानदीप सोसायटीमार्गे टेकडीवर मिरवणूक पोहोचली.यावेळी होम हवन, पूजा अर्चा करण्यात आली. याप्रसंगी नंदुरबारसह वावद, धुळे, मालेगाव, नगर, नाशिक, शिरपूर येथून दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नवस पूर्ण केले.खडतर अशा पायवाटेने भाविकांनी मंदिरावर मार्गक्रमण केले.उत्सवाचे मानकरी यांच्या हस्ते मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले.श्री काशिनाथ बाबा मंदिराजवळ हनुमान मूर्ती आणि महादेवाची पिंड आहे.या ठिकाणी अभिषेक व आरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.