नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात बेकायदेशीररित्या भरलेल्या गॅस सिलेंडरमधून खाली गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरतांना आढळून आल्याने दोघा दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे . त्यांच्याकडून गॅस भरण्यासाठी लागणारे सुमारे २५ हजार रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात वसिम अब्दुल वाहेद पिंजारी व अब्दुल खलील अब्दुल हक हे दोघेजण त्यांच्या गॅस रिपेअरिंगच्या दुकानात बेकायदेशीररित्या भरलेल्या गॅस सिलेंडरमधून खाली गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरतांना आढळून आले . याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोना.राकेश नानाभाऊ मोरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात जिवनावश्यक वस्तू कायदा कलम १ ९ ५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ हजार रुपये किंमतीचे एक इलेक्ट्रिक मोटार , १८ हजार १०० रुपये किंमतीचे ७ सिलेंडर टाक्या , १ हजार रुपये किंमतीचे रेग्यूलेटर असे एकूण २५ हजार १०० रुपये किंमतीचे गॅस सिलेंडर भरण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे . याप्रकरणी पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत .