नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा परिसरातील धामणदरी धाम डोंगरावरील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कुलदैवत देवमोगरा माता मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांना मुद्देमालासह पकडण्यात विसरवाडी पोलीसांना यश आले आहे. रिंकु दिलीप गावित रा. नागझरी ता. नवापूर व रविन जालम्या गावित रा.भवरे ता.नवापूर अशी दोन्ही संशयितास ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचे पुजारी पंत्या पांड्या गावीत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांनी दि. ८ नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री धामणदरी धाम डोंगरावरील देवमोगरा मातेच्या मंदीरात आत प्रवेश करून देवमोगरा मातेच्या गळ्यातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले.
यात ३ तोळे वजनाचे सोन्याचा हार रक्कम १ लाख ५० हजार रुपये तर ६० तोळे वजनाचे चांदीचे दागिने रक्कम ३४ हजार २०० रुपये असा एकूण १ लाख ८४ हजार २०० रुपये एवज अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी १०:३० वाजेच्या दरम्यान दागिने चोरून नेले.
विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. सदरील चोरीच्या घटनेची माहिती घेऊन अज्ञात चोरट्याचा शोध घेत गुप्त माहितीच्या आधारे विसरवाडी बसस्थानक परिसरात संशयित रिंकु गावित व रविन गावित याने त्याचे साथीदारांसह मिळून चोरी केल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे गुन्ह्यांचे अनुशंगाने केलेल्या चौकशीत मुद्देमाल हस्तगत केले.
संशयित आरोपीत हे सध्या विसरवाडी पोलीसांच्या ताब्यात असुन न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. पुढील तपास पोहेकॉ. हिंदुस्तान नाईक हे करीत आहे.








