नंदुरबार l
वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर एक स्तर वेतनश्रेणी बंद करण्यात आलेल्या जिल्ह्यातील तिसर्या टप्प्यातील ११० प्राथमिक शिक्षक व चौथ्या टप्प्यातील २३० प्राथमिक शिक्षक यांनी एक स्तर वेतनश्रेणी लागू करणेबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) जिल्हा शाखा नंदुरबार यांच्याकडे न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी अर्ज सादर केला होता.
३४० शिक्षकांतर्फे मेहरबान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ऍड.बालाजी शिंदे यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सदर याचिकेचा निर्णय हा याचिकाकर्त्या शिक्षकांच्या बाजूने लागलेला होता. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना शिक्षक परिषदेतर्फे निवेदन देऊन एक स्तर वेतनश्रेणी लागू करणेबाबत गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना आदेश निर्गमित करणेबाबत निवेदन देण्यात आले होते. शिक्षक परिषदेने केलेल्या पाठपुराव्याअंती नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी एक स्तर वेतन श्रेणी लागू करणेबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली असून सदर आदेश निर्गमित केलेले आहेत.
या कामी शिक्षणाधिकारी (प्राथ.) सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारणार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री.जाधव व श्री.गावित, लेखा विभागाचे लेखाधिकारी श्री.जाधव व श्री.बडगुजर यांचे अनमोल सहकार्य लाभले. शिक्षक परिषदेने यापूर्वी देखील २६६ शिक्षकांना न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केलेला होता. जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षक परिषदेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून पुनश्च ३४० शिक्षकांनी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून न्यायालय जाण्याचा निर्णय करून शिक्षक परिषदेवर विश्वास व्यक्त केला होता. त्या विश्वासास शिक्षक परिषद आज पात्र ठरली असून आज आदेश निर्गमित झालेले आहेत.
आदेशाच्या पाठपुराव्याकामी राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड, विभागीय संपर्कप्रमुख आबा बच्छाव, जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, कार्यवाह किरण घरटे, कोषाध्यक्ष शरद घुगे, जिल्हा संघटन मंत्री प्रकाश बोरसे, कार्याध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, दिनेश कमलेश पाटील, देवेंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. अशी माहिती जिल्हा कार्यवाह किरण घटरे यांनी दिली.








