तळोदा | प्रतिनिधी
तळोदा येथील ठाणेदार गल्लीत राहणारे रहिवासी हे बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने पहाटेच्या सुमारास घराचे कुलूप तोडून गोदरेज कपाटातील पावणे दोन लाखांची रोकड, चार तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा येथील ठाणेदार गल्ली येथील रहिवासी अशोक रामदास चौधरी हे राणा प्रताप इंग्लिश स्कूल प्रतापपूर येथे नोकरीला आहेत. शाळेला सुट्टया असल्याने ते आपल्या परिवारासह चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास लोखंडी सळीच्या सहाय्यने घराचे प्रवेशद्वारावरील कुलूप तोडून प्रवेश केला.
घरातील गोदरेज कपाटातील १ लाख ७५ हजार रुपये रोख,सोन्याचे दोन तोळयाचे तुकडे व दागिने दोन तोळा असे मिळून चार तोळे सोने व चांदी ७५ तोळा असा ऐवज सदर अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास चोरुन लंपास केली. याबाबत अशोक रामदास चौधरी यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा येथील पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसे तज्ञांना बोलविण्यात आले आहे. सदर चोरीच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत.