अक्कलकुवा l प्रतिनिधी
सातपुडयाचा रानमेवा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सीताफळाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून सीताफळाच्या विक्रीतून अति दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र सीताफळावर प्रक्रिया करुन त्यापासून विविध पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान व उद्योग या भागात विकसित झाले ले तर त्यातून स्थानिक आदिवासी बांधवांना नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध होत, त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊ शकतो. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासन आणि प्रशासनाने ठोस कार्यवाही करण्याची नितांत आवश्यकता आहे.
सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये हजारो सीताफळांची झाडे आहेत दरवर्षी या झाडां पासुन मोठया प्रमाणावर सीताफळे उपलब्ध होतात.साधारणपणे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात सीताफळाचा हंगाम असतो.या हंगामात दुर्गम भागातील आदिवासी बांधव सीताफळ विक्रीसाठी धडगाव,मोलगी व अक्कलकुवा शहरात मोठ्या संख्येने दाखल होत असतात.सातपुड्यातील नागरिक कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता सीताफळांच्या झाडांचे नैसर्गिकरित्या संगोपन करतात तसेच या झाडांना आलेले सीताफळ देखील नैसर्गिकरित्या पिकविली जातात. परिणामी येथील सीताफळे चवीला अधिक गोड व स्वादिष्ट लागतात.
त्यामुळे येथील सीताफळांना महाराष्ट्रा सह गुजरात, व मध्य प्रदेश मध्ये मोठी मागणी असते.या ठिकाणांचे व्यापारी गावोगावी जाऊन सीताफळांची खरेदी करीत असतात तर काही शेतकरी हे आपली सीताफळे थेट बाजारात विक्रीसाठी आणत असतात.यावर्षी देखील सातपुड्याचा रानमेवा अक्कलकुवा,धडगाव,मोलगी, तळोदा आदी बाजारपेठेत दाखल झाला आहे.त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांसोबत सीताफळांच्या खरेदीसाठी नागरिक देखील मोठी गर्दी करीत आहेत.
सीताफळाची प्रत खराब होऊ नये यासाठी आदिवासी बांधव सीताफळे टोपलीमध्ये घेऊन येत असून पूर्ण टोपलीनुसार त्यांची विक्री करीत आहेत. मोठ्या टोपलीला साधारण पणे अडीचशे ते तीनशे रुपये तर लहान टोपलीतील सीताफळांना दीडशे ते दोनशे रुपयांना ग्राहक खरेदी करीत आहेत. यानुसार साधारणतः एका किलोला तीस ते पस्तीस रुपये भाव पडत आहे.
सातपुड्याच्या रानमेवा खरेदीसाठी नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील व्यापारी देखील मोठ्या प्रमाणावर या सीताफळांची खरेदी करीत आहेत. आणि येथून खरेदी केलेली सीताफळे मोठ्या शहरात अधिक दराने विक्री करीत आहेत
सीताफळा वर आधारित उद्योगाची गरज
सीताफळ हे पिकल्यानंतर लगेच एक ते दोन दिवसांत खराब होणारे फळ आहे त्यामुळे त्याला व्यापारी किंवा शेतकऱ्यांना जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे सीताफळावर आवश्यक ती प्रक्रिया करुन त्यापासून विविध पदार्थ तयार करुन ते बाजारात विकले तर स्थानिक ग्रामस्थांना अधिक पैसा कमविण्याची संधी मिळेल व जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. मात्र त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाने ठोस पावले उचलुन योग्य कार्यवाही व पाठपुरावा करणे गरजेचे आहे.सातपुड्याच्या कुशीत आमसुल व सीताफळ यांचे मुबलक प्रमाण पाहता नागरिकांना त्यापासुन निर्मित होणाऱ्या प्रक्रिया आधारित उद्योगांची नितांत आवश्यकता आहे.मात्र त्यासाठी लोक प्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होतेय