नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विभागीय खो-खो स्पर्धा संपन्न झाली असून पुरुष गटामध्ये नंदुरबारचा संघ तर महिलांमध्ये जळगावचा संघ विजयी झाला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव खेळ विभागाच्या वतीने जळगाव, एरंडोल, धुळे आणि नंदुरबार येथील विभागीय संघाची खो-खो स्पर्धा नवापूर तालुक्यातील विसरवाडी महाविद्यालयांमध्ये संपन्न झाली. या खोखो स्पर्धेसाठी पुरुष गटातील चार संघ व महिला गटातील चार संघ असे एकूण आठ संघ स्पर्धेसाठी दाखल झाले होते. विसरवाडी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बी व्ही गावित खेळ विभागाचे प्रमुख डॉ. राहुल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धांचे उद्घाटक व अध्यक्ष जळगाव विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे चीतवी गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुनील गावित यांच्या हस्ते मैदान क्रमांक एक व मैदान क्रमांक दोन वर अदानी ग्रामपंचायतचे माजी सरपंच बिपिन गावित यांच्या हस्ते श्रीफळ फोडून खो खो स्पर्धायला सुरुवात करण्यात आली होती. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या विभागीय खोखो स्पर्धेमध्ये आठ संघांत 12 सामने साखळी पद्धतीने पार पडले.
अंतिम फेरीमध्ये पुरुष गटात नंदुरबार व जळगाव विभाग संघामध्ये झालेल्या अटीतटीच्या चुरशीच्या लढाईत नंदुरबार विभाग संघाने एक डाव व एक गुणने आघाडी घेत जळगाव विभाग संघाला पराभूत करत विजय संपादन केला. तर महिला गटामध्ये अंतिम फेरीत जळगाव आणि धुळे संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात जळगाव महिला संघाने विजय संपादन केला. दिवसभरात झालेल्या सर्व साखळी खो-खोचे सामने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. या सामन्यांसाठी महाराष्ट्र खो-खो ओसिएशनचे पंच अनिल रौंदळ, हरीश पाटील, वसंत गावित, करण चव्हाण, विशाल सोनवणे, कुमार वळवी या 6 पंचांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याने सामने सुरळीत पार पडले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत नंदुरबार जिल्ह्याला विभागीय खो-खो सामने आयोजित करण्यासाठी पहिल्यांदाच संधी उपलब्ध झाली. या संधीच नवापुर तालुक्यातील विसरवाडी सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालयाने जबाबदारी घेऊन खेळण्यासाठी क्रीडांगण व चहा नाश्ता जेवणाची उत्तम सोय केल्याने खेळाडू व संघ व्यवस्थापकांनी आभार मानले. या विभागीय खोखो स्पर्धांसाठी जळगाव विद्यापीठातील खेळ विभागाचे डायरेक्टर डॉ. दिनेश पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. सर्व सामने खेळीमेळीच्या वातावरणात अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडल्याने त्यांनीही संघ व्यवस्थापन व आयोजक विसरवाडी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे कौतुक केले.
प्रथमच विजेत्या संघांना विसरवाडी एज्युकेशन सोसायटी तर्फे भरत माणिकराव गावित यांच्यावतीने लोकनेते स्वर्गीय दादासाहेब माणिकरावजी गावित व स्वर्गीय सुरेखाबाई माणिकरावजी गावित यांच्या स्मृतिपत्यार्थ भव्य चषक भेट देऊन विद्यापीठ क्रीडा विभागाला समर्पण करण्यात आले. आकर्षक चषक भेट विजेत्या संघासाठी ही आकर्षण ठरले होते. सर्व खेळाडूंसाठी विसरवाडी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष भरत गावित यांच्यावतीने लोकनेते स्वर्गीय दादासाहेब माणिकरावजी गावित यांच्या स्मृती पित्यार्थ सर्व खेळाडू व संघ व्यवस्थापना साठी उत्तम भोजनाची सोय करण्यात आली होती.
या खोखो स्पर्धेसाठी विसरवाडी सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य बी व्ही गावित, खेळ विभागाचे प्रमुख डॉ. राहुल ठाकूर, विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी यांनी आलेल्या खेळाडू व संघ व्यवस्थापकांसाठी नियोजनात मोठी मेहनत घेतली. यावेळी उद्घाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दिनेश पाटील, व अध्यक्ष डॉ. विजय पाटील, प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य सुनील गावित, हळदाणी माजी सरपंच बिपिन गावित, पंचायत समिती सदस्य सुरेश गावित, बालमराई सरपंच प्रदीप गावित, माजी सरपंच खानापूर दिलीप गावित, माजी सरपंच हळदाणी दिनकर गावित, हळदाणी ग्रामपंचायत सदस्य संजय गावित, वडसात्रा सरपंच अविनाश गावित, सामाजिक कार्यकर्ते जयेश अग्रवाल, भाजपा जिल्हा सचिव संदीप अग्रवाल, भाजपा अल्पसंख्यांक एजाज शेख आदी उपस्थित होते. जळगाव विद्यापीठातील विभागीय खो-खो स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील आजी-माजी खेळाडू व प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.