नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत.सदर प्रश्नांकडे पदाधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.याबाबत निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी अखिल प्राथमिक शिक्षक संघातर्फे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे खालील प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत शिक्षकांच्या याच प्रलंबित मागण्यासाठी वर्षभरात जिल्हा प्रशासनास अनेकदा भेटी देऊन निवेदन दिलेत तसेच वेळोवेळी शिक्षकांचे प्रश्न निदर्शनास आणून दिलेत मात्र अपेक्षित फलश्रुती झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
हे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत आणि अखिल संघाच्या मागणीकडे पदाधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न वेळीच सुटावेत यासाठी दि.16 नोव्हेंबर 2022 बुधवारी जिल्हा परिषद कार्यालय नंदुरबार समोर शांततामय पद्धतीने व लोकशाही मार्गाने केवळ अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.
यातील प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असून त्यात, मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे, शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे, निवडश्रेणीसाठी पात्र शिक्षकांचा दुसरा टप्पा मंजूर करणे, वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करणे, शासन निर्णयानुसार पगार दरमहा 1 तारखेला मिळावा, भविष्य निर्वाह निधीच्या नोंदी पूर्ण करून मार्च 2022 पर्यंतचा हिशोब मिळावा, NPS खाती उघडून कपात सुरू करावी आणि DCPS कपातीचा हिशोब मिळावा, शाळा बांधकाम व दुरुस्ती कामांचा पाच टक्के निधी मिळावा, यासाठी अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने रघुनाथ गावडे नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतुल गायकवाड लेखाधिकारी, राजेंद्र पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सतीश चौधरी शिक्षण अधिकारी यांना एक दिवसीय धरणे आंदोलनाची नोटीस देण्यात आली.
सदर धरणेचे निवेदन माहितीस्तव अध्यक्षा, उपाध्यक्ष जि.प. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी सुरेश भावसार, अशोक देसले, संजय खैरनार, संजय देवरे, चव्हाण, अमृत पाटील, विशाल पाटील आधी पदाधिकारी उपस्थित होते. धरणे आंदोलनासाठी अखिल नंदुरबार जिल्हा व सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाची रितसर रजा टाकून उपस्थिती नोंदवावी असे आवाहन करण्यात येत आहे.