नंदूरबार l प्रतिनिधी
धुळे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ६० अ.भा.अंकुर मराठी साहित्य संमेलनात उत्कृष्ट कथासंग्रह म्हणून ‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाला अंकुर वाड्.मय राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या कथासंग्रहाच्या लेखिका वृषाली नरेंद्र खैरनार यांना संमेलनाध्यक्ष डॉ.पापालाल पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक संजय रामदास वाघ व अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष हिंमत ढाले, तुळशीराम बोबडे, प्रमोद कोपर्डे उपस्थित होते.
अंकुरच्या या वाड्.मय पुरस्कारासाठी वीस हून अधिक कथासंग्रह आलेले होते. यामधून आदिवासी व ग्रामीण भागातील समस्यांवर भाष्य करणा-या ‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाची निवड केल्याचे परिक्षक प्रा.मोहन काळे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने ‘दुष्टचक्र’ कथासंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. धुळे व जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन वृषाली खैरनार यांनी या कथांचे सादरीकरण केलेले आहे.
मोलगी (ता.अक्कलकुवा) सारख्या अतिदुर्गम भागात अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वृषाली खैरनार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अंकुर साहित्य संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष राम जाधव व कार्याध्यक्ष दत्तात्रय कल्याणकर यांच्या सह साहित्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.








