नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी अहिराणी भाषेत सुरूवात करत राम राम कशे बठ्ठा, दिवायी कशी गई जोरमाना असे सांगत खान्देशना लोके पक्का दिलदार शेतस मुठभर लेतस तगारीभर देतस काळजी करू नका, तुम्हना भाऊ एकनाथ शिंदे तुम्हना करता जे जे शक्य ते ते करी असे सांगत उपस्थितांचे मने जिंकली.
अहिराणी भाषेत भाषणाला सुरुवात करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांची मने जिंकली. नंदुरबार येथील जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, अब्दुल सत्तार, आ.मंजुळा गावित, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके आदी उपस्थित होते. यापुढे बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या अडीच ते तीन महिन्यात गेल्या अडीच वर्षात थांबलेल्या विकासाला, रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे. तीन महिन्यात ७२ मोठे निर्णय घेतले आहेत. जल सिंचनाच्या प्रकल्पांना गती देण्याचे काम करत आहोत. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम सुरु आहे.
लोकांच्या मनातले सरकार स्थापन झाले असून सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे सरकार आहे.शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावेत यासाठी जल सिंचन प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. आगामी काळात सेंद्रीय शेतीला देखील प्राधान्य दिले जाणार आहे. पोलिसांसाठी ५० लाखांचे घर अवघ्या १५ लाखात देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचेही काम करण्यासाठी पाठबळ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी सरकार काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच तोरणमाळ पर्यटन विकास, नर्मदा-तापी प्रकल्प, एमआयडीसी आदी प्रकल्पांना गती देवून जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.








