नंदुरबार । प्रतिनिधी
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यामागे लागलेली चौकशी बंद करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुठलीही कारवाई सुडबुध्दीने करण्यात येत नाही. अहवाल आल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येत आहे. कोणावरही अन्याय होणार नाही. याबाबत यंत्रणा दक्षता घेत आहे. कारवाईचा अधिकार आम्हाला नाही असे त्यांनी सांगीतले.
आ.आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत ना.शिंदे यांनी हल्लाबोल करीत सांगितले की, मागील इतिहास पाहिला तर शेतकर्यांना सर्वात मोठी नुकसान भरपाई आम्ही दिली आहे. निकशात बसत नाही, त्यांनाही भरपाई दिली आहे. शेतकर्यांना मदतीसाठी 6 हजार कोटी भरपाई देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
त्यासाठी आम्ही निकष बदलला. आ.आदित्य ठाकरेंनी आकडे पहावे. चांगल्याला चांगले म्हणण्याची वृत्ती असायला पाहिजे. शेतकर्यांना सरकार वार्यावर सोडणार नाही. लाखो हेक्टर जमिन ओलीताखाली आणण्यासाठी आम्ही अडीच वर्षापासून जे प्रकल्प थांबवण्यात आले होते. त्यांना चालना दिली.
यासाठी हजारो कोटीचा निधी देत आहोत. राज्यातील युवकांसाठी 75 हजार नोकर्यांची कारवाई सुरू असून ज्या सरकारकडे बहुमत असते, ते सरकार कायदेशीर असते असे ना.एकनाथ शिंदे यांनी सांगितले.








