नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथील ज्वलेर्सचे दुकान फोडणाऱ्या दोन आरोपीतांना 24 तासाच्या आत पाच किलो चांदीच्या मुद्देमालासह अटक केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर हे 17 ते 19 पर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले होते. 19 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर हे शहादा येथे तपासणीसाठी आले असता तक्रारदार प्रतिक पवनकुमार गेलंडा रा- तेरापंती भवन लक्ष्मीनगर शहादा हे शहादा पोलीस ठाणे येथे आले. त्यांनी त्यांचे रत्नलाभ ज्वेलर्स या दुकानातून 5 किलो वजनाचे चांदीचे दागिने हे दुकानाची मागील भिंत फोडुन त्यातुन छतावर चढुन तसेच छताचे स्लॅप फोडुन दुकानाच्या आत प्रवेश करुन घरफोडी केल्याचे सांगितले.
तसेच मोहम्मद साजिद खत्री यांचे पेहनावा फॅशन या कापडाचे दुकानातुन देखील 15 हजार रुपये अज्ञात चोरटयाने चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्या तक्रारीवरुन शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द् भादवि कलम 457,380 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी तसेच नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहादा येथे घडलेल्या दोन घटनांची गांभीर्याने दखल घेतली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देवून आरोपीत व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत निर्देश दिले.
सदर घटनेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ 3 पथके तयार केली. त्यातील 2 पथके ही दोंडाईचा व खेतीया परिसरामध्ये रवाना केली. तसेच 01 पथक हे गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषण करीत होते.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा येथील झालेल्या घरफोडीतील आरोपी पैकी एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन तो प्रेस मारुती मंदिरजवळ राहत आहे. सदरची बातमी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ प्रेस मारुती मंदिराजवळ रवाना झाले. तसेच प्रेस मारुती मंदिराजवळ राहात असलेल्या सराईत गुन्हेगाराबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता
अली ऊर्फ बबलू हा सराईत आरोपी प्रेस मारुती मंदिराजवळ राहत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेला बातमीदारमार्फत समजले.प्रेस मारुती मंदिराजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत सावधानता बाळगत सापळा रचला, परंतु संशयीत आरोपी अली ऊर्फ बबलू हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे आपण पोलीसांच्या सापळ्यात अडकलो असल्याचे लक्षात येताच संशयीत आरोपी अली ऊर्फ बबलू याने तेथून पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करुन अली ऊर्फ बबलू खान अफजल खान पठाण रा.ठि प्रेस मारुती मंदिराजवळ, शहादा याला अटक केली.अली ऊर्फ बबलू यास शहादा पोलीस ठाणे येथे आणून ज्वेलरीच्या दुकानातील घरफोडी बाबत विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला.
त्यास कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता त्याने ज्वेलर्सच्या घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या बरोबर दुसरा साथीदार विक्की संजय सुर्यवंशी रा. सालदार नगर, शहादा हा असल्याचे सांगितले. त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सालदार नगर येथून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी पेहनावा फॅशन या कपडयाच्या दुकानात देखील चोरी केल्याची कबुली दिली. तसेच घरफोडी केलेल्या चांदीच्या दागिन्यांबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करुन 3 लाख रुपये किमतीचे 5 किलो वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीतांकडून उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करून त्यांना अटक करण्यात आली.तसेच शहादा व आजुबाजुच्या परिसरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक बाळकृष्ण गोरे, पोलीस नाईक विकास हिम्मत कापुरे, पोलीस कॉन्सटेबल विजय धनसुखलाल ढिवरे यांच्या पथकाने केली आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, सध्या दिपावलीचा उत्सव असल्याने सर्व नागरीकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. तसेच घरातुन बाहेर किंवा परगावी जातांना घर व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी. तसेच शेजारील व्यक्तीला त्याबाबत कल्पना द्यावी. कोणीही संशयास्पद व्यक्ती आपल्या घराजवळ किंवा आजुबाजुच्या परिसरात दिसुन आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला अथवा डायल 112 क्रमांकावर संपर्क करुन कळवावे.