नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कवळीथ येथील हायस्कूलमधील सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी नंदूरबार रेल्वे पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदलाल रामदास शिंपी (५६) रा. डोंगरगाव रोड, शहादा असे मयत शिक्षकाचे नाव आहे. शिंपी हे कवळीथ येथील आदर्श हायस्कूलमध्ये कार्यरत होते. सोमवारी दुपारी त्यांनी दोंडाईचा येथील उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या केली. शाळेतील सहकारी शिक्षक व काही कर्मचारी त्रास देत असल्याने आत्महत्या करीत असल्याची पोस्ट शिंपी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली होती.
सोमवारी रात्री उशिरा आत्महत्या करणारे शिक्षक हे शहादा येथे रहिवासी असल्याचे समोर आले होते. आत्महत्येपूर्वी शिंपी यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहून सहकारी शिक्षक आणि कर्मचारी यांची नावे सांगत, त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. मयत नंदलाल शिंपी यांच्यावर शहादा येथे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी नंदूरबार रेल्वे पोलिसात फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








