शहादा l प्रतिनिधी
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या दुसरा टप्पा अंतर्गत डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्ट-अप यात्रा याअंतर्गतचा दुसरा टप्पा – जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र, रोजी डी. एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहादा येथे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. यासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना असणाऱ्या आणि नवउद्योजक होवू इच्छिणा-या युवक-युवती आणि नागरिक प्रशिक्षण शिबीर व संकल्पना सादरीकरणासाठी उपस्थित होते .
नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. याअनुषंगाने, जिल्हयातील नागरीकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.

प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, तसेच, नोंदणी केलेल्या 104 नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आयोजित करण्यात आले. सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा इ.), ई प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा व गतिशीलता आणि अन्य या क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे प्रत्येकी दहा मिनिटांत सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात आली.
यामधून जिल्हास्तरावर अव्वल तीन पारितेषिक विजेते घोषित केले. सदर कार्यक्रमाला पुलकित सिंग, (आयएएस अधिकारी नंदुरबार), प्रमोद पाटील (डीडीएम नाबार्ड), डॉ. राजेंद्र दहातोंडे (सीनियर सायंटिस्ट केवीके), विजय रीसे (असिस्टंट कमिशनर स्किल डेव्हलपमेंट ), शंकर जाधव (स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर नंदुरबार), शन्मुख सोनवणे (एमजी एन एफ), मनोहर अहिरे (डीएसडीसी), व संदीप वसईकर, (स्किल डेव्हलपमेंट), शहादा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एल.पटेल हे उपस्थित होते. दरम्यान,नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे करण्यात आले. महाविद्यालयातर्फे उपकरणीकरण विभागाचे प्रा. हिमांशू पटेल व सहकाऱ्यांनी सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील,सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन जे पाटील , अकेडमिक डिन डॉ. डी. एम. पटेल यांनी उपक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले.








