नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बामखेडा येथे गांजाची शेती करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली असून 3 लाख 52 हजार रुपये किमंतीचा 50 किलो गांजा जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील फेस बामखेडा गाव शिवारात एका इसमाने त्याच्या कपाशीचे पिकाचे शेतात बेकायदेशीररीत्या गांजाचे झाडांची लागवड केली असल्याची खात्रीशिर बातमी सांगितली.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ व त्यांचे अमलदार हे मिळालेल्या गोपनीय बातमीच्या ठिकाणी फेस-बामखेडा गावाचे शिवारात कापसाचे पीक असलेल्या शेतांकडे पायी गेले असता सदर बातमीमधील संशयीत एका कापसाचे पिकाचे शेतात हालचाली करत असल्याचे दिसुन आले.
पोलीसांचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच त्याने तेथून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखा व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदारांनी त्यास पाठलाग करुन जंगलात पळुन जाणाऱ्या राकेश हिरालाल शिरसाठ रा. बामखेडा ता. शहादा याला पकडले.
पोलीसांनी कापसाच्या शेताची पाहणी केली असता शेतात आतील बाजुस ठिकठिकाणी हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपुर्ण शेती पिंजुन काढली असता तेथे 50 किलो 315 ग्रॅम वजनाचे 3 लाख 52 हजार 205 रुपये
किंमतीची एकुण 25 गांजाची झाडे मिळुन आल्याने गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतला. तसेच राकेश हिरालाल शिरसाठ याच्याविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 (क), 20 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सपोनि संदीप पाटील सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक दादाभाई मासुळ, विकास कापुरे, पोलीस अमलदार किरण मोरे, राजेंद्र काटके फॉरेन्सीक टीमचे पोलीस अंमलदार दिनेश लाडकर, संजय रामोळे, चेतन चौधरी, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शानाभाऊ ठाकरे, विजय गावीत यांचे पथकाने केली.
तंबाखूजन्य व अमली पदार्थांचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात. तसेच अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो. तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहावे असे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी आवाहन केले.








