नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार पंचायत समितीतील शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यकाने महागाई भत्त्याचा फरक व सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्या हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी दोन हजाराची लाच मागितली.दोन हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्याला रंगेहाथ अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा जानेवारी २०२२ पासूनचा ३ टक्के महागाई भत्त्याचा फरक व सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्या हप्त्याचे बिल मंजूर करण्यासाठी नंदुरबार पंचायत समितीतील शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक प्रकाश गोविंदा निकवाडे रा.भोई गल्ली शिंदखेडा याने लाचेची मागणी केली.
३ टक्के महागाई भत्त्याच्या फरकासाठी ३ हजार व सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्या हप्त्याच्या बिलासाठी २ हजार रुपये असे एकुण ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ हजार रुपये लाचेची रक्कम आज दि.१४ ऑक्टोबर रोजी पंचसाक्षीदारांसमक्ष पंचायत समितीच्या कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या चहाच्या दुकानावर स्विकारतांना निकवाडे याला रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कामगिरी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, पोना अमोल मराठे, मनोज अहिरे, देवराम गावित, ज्योती पाटील, संदीप नावाडेकर, चालक पोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.








