नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीच्या निवडीत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व अबाधित राखले असुन सभापती पदी नानसिंग वळवी यांची तर उप सभापती पदी मेलदीबाई वळवी यांची निवड झाली आहे.
पुढील सव्वा दोन वर्षासाठी आज अक्कलकुवा पंचायत समितीच्या दिगंबरराव पाडवी सभागृहात सभापती निवडीसाठी विशेष सभा संपन्न झाली.सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून अक्कलकुव्याचे तहसीलदार सचिन मस्के यांनी पिठासीन अधिकारी तर गट विकास अधिकारी महेश पोतदार यांनी सहा.पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.सकाळी 11 ते 1 वाजे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
1 ते 2 वाजेच्या दरम्यान छाननी ,2 ते 3 वाजे दरम्यान माघार घेण्यात आली. 3 वाजे नंतर प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्यात आली.सभापती पदासाठी काँग्रेस तर्फे उपसभापती विजय पाडवी, नानसिंग वळवी तर भारतीय जनता पार्टी तर्फे ॲड.सुधीर पाडवी यांनी अर्ज सादर केले होते.सर्व अर्ज वैध ठरविण्यात आल्या नंतर उप सभापती विजय पाडवी यांनी पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाने माघार घेतल्याने
काँग्रेसचे नानसिंग वळवी व भाजपाचे सुधीर पाडवी यांच्यात सरळ लढत झाली त्यात नानसिंग वळवी यांना 13 तर सुधीर पाडवी यांना 7 मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवारा पेक्षा जास्त मते मिळाल्याने नानसिंग वळवी यांना विजयी घोषित करण्यात आले.
उपसभापती पदासाठी काँग्रेसतर्फे मेलदीबाई वळवी, आपसिंग वसावे,भाजपातर्फे अशोक वसावे, तर शिवसेने कडुन अश्विनी वसावे यांनी अर्ज घेतले होते मात्र त्यापैकी आपसिंग वसावे यांनी अर्ज सादर केलाच नाही तर भाजपाचे अशोक वसावे यांनी माघार घेतल्यामुळे काँग्रेसच्या मेलदीबाई वळवी व शिवसेनेच्या अश्विनी वसावे यांच्यात सरळ लढत झाली
त्यात मेलदीबाई वळवी यांना 13 तर अश्विनी वसावे यांना 7 मते मिळाली.मेलदीबाई वळवी यांना जास्त मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
अक्कलकुवा पंचायत समितीत एकुण 20 सदस्य आहेत त्यात 13 सदस्य काँग्रेसचे ,भाजपाचे 4 तर शिवसेनेचे 3 सदस्य आहेत.सभापती व उपसभापती पदाच्या निवडणूकीत भाजप शिवसेनेने एकत्र येत ही निवडणूक लढली.तर काँग्रेसला आपल्या सदस्यांना एकसंघ ठेवण्यात यश मिळाले. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वसावे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश करुन शिवसेनेची वाट धरली त्यामुळे सभापती निवडीत पक्षाच्या सदस्यांची क्रॉस वोटिंग होतेय का अशी भीती व्यक्त होत होती मात्र विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ न जुळल्याने काँग्रेसचे एक विरोधात जाणारे मत दोन्ही निवडणूकीत काँग्रेस कडे वळल्याचे दिसले.