नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील अस्तंबा -अरणबारी घाटातील नकटयादेव पाड्यावरील दरीत बकऱ्या चरावयास गेलेल्या युवकावर दरड कोसळल्याने अस्तंबा येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली.धडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथील रायसा बिंद्या वळवी ( वय ४०) व त्यांचा लहान भाऊ केशव बिंद्या वळवी (२७) हे दोन्ही भाऊ दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सुमारे ३ वाजेच्या दरम्यान अरणबारी घाटात बकऱ्या चरावयास गेले असता परिसरात जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे अचानकपणे दरड कोसळायलासुरु झाली.
पाऊस व दरडपासून संरक्षण व्हावे याकरिता पळत असतांना दरडचे काही दगडे केशव बिंद्या वळवी यांच्या डोक्यात, कपाळावर, व डोळ्याजवळ लागल्याने तो गंभीर जखमा झाला. अति रक्तस्राव झाल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. काल खुप पाऊस होता व सदर परीसर हा अतिदुर्गम भागातील असल्याने आज पोलीसात फिर्याद देण्यात आली.
रायसा बिंद्या वळवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना दीपक वारुळे करत आहेत. मयत केशव बिंद्या वळवी यांच्या पश्चात बायको, दोन मुले असा परिवार आहे.








