नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सोमवार १० ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील एक ते १९ वर्षे वयोगटातील एकूण ५ लाख ७ हजार ९०२ अपेक्षित मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या वाटपाचे नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद पंडित चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
ही मोहीम यशस्वी राबविणेसाठी ७ ऑक्टोंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल समितीतीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांना संयुक्तपणे १०० टक्के लाभार्थींना जंत नाशक गोळीप्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिली जाईल याबाबत सुचना दिल्यात. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, अंगणवाडी, शाळांमध्ये सोमवारी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबवण्यात येणार आहे.
या मोहिमेपासून वंचित राहिलेल्या बालकांना १७ ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळ्या देण्यात येतील. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आशा स्वयंसेविकांमार्फत घर भेटीतून या गोळ्या दिल्या जातील. आतड्यांमधील कृमीदोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणाऱ्या रक्तशय व कुपोषणास जबाबदार आहे. यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील आरोग्य, शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे तीव्र प्रमाणात कृमिदोष असलेले विद्यार्थी आजारी पडतात, थकवा येतो,
अभ्यासात लक्ष लागत नाही त्यामुळे शाळेत अनुपस्थितीचे प्रमाण वाढते. आतड्यामधील कृमीदोष वैयक्तिक व परिसर अस्वच्छतेमुळे होतात, बालकांमध्ये याचा प्रसार दूषित माशी, अस्वच्छ हात, अस्वच्छ फळे, भाज्या व अन्नामुळे फार सहजतेने होतो. यावर शाळा व अंगणवाडीतून दिली जाणारी जंतनाशक गोळी ही फार परिणामकारक आहे.या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ठ मुलींचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व विद्यार्थ्यांचा जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. या मोहिमेतंर्गत जंतनाशक गोळ्या मुला मुलींनी घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी मा.मनीषा खात्री यांनी केले आहे








