नंदूरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालयाच्या सोहम रमेश वसावे या विद्यार्थ्याचे ‘बेबी कॅरिंग बेड‘ हे उपकरणाने आदिवासी प्राथमिक राखीव गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांची राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
सन २०२१-२२ चे ४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने भरवण्यात आले होते.बस,रेल्वे प्रवासात लहान बाळांचे होणारे हाल बघता या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. हा असा बेड आहे की त्यात बाळाच्या झोपण्याच्या सोयीसोबतच त्याच्या खेळण्यांची, खाणपानाची सोय करण्यात आली आहे.छोटा पंखा देखील लावण्यात आला असून हा बेड बस,रेल्वे यांसारख्या वाहनांमध्ये सहज नेता येतो.
जेव्हा वाहनांमध्ये बसायला जागा उपलब्ध होत नाही अशा वेळी हा बेड वाहनातील मोकळया जागेत ठेवता येतो. असे हे बहुउपयोगी बेबी कॅरिंग बेड बनविण्यासाठी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक मंगेश देवरे यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर,रोहन नटावदकर गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे,प्राचार्य व्ही.एस.वाघ,विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी पालक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते वनवासी विद्यालयाने ह्या पूर्वी एकूण ४ वेळा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तर २ वेळा इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनात राज्यस्तरा वरील प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे