अक्कलकुवा l प्रतिनिधी
आदिवासी समाजाचा फार मोठा इतिहास आहे. आपले पुर्वजांनी शिवाजी महाराजांचे सहकारी म्हणून काम केले.सर्व आदिवासी समाज शिवाजी महाराजांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहिला मात्र शिवाजी महाराजां सोबत आदिवासींचा इतिहास का लिहिला गेला नाही असा घणाघात करीत आदिवासींचा जाज्वल्य इतिहास लिहिण्याची गरज असल्याचे ठाम मत विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी मांडले.

बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा यांच्या वतीने बलिदान वीर आदिवासी मावळ्यांचे,स्मरण शिवनेरी वरील आदिवासी चौथऱ्याचे या शूर वीरांच्या स्मृती दिना निमित्त आदिवासी समाज प्रबोधन मेळावा पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे संपन्न झाला.यावेळी आमदार आमश्या पाडवी हे बोलत होते.
मेळाव्याच्या निमित्ताने मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार,झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, भारतीय ट्रायबल पार्टीचे संस्थापक अध्यक्ष छोटुभाई वसावा, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ,माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार सतिश पेंदाम, आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले की, राज्याच्या मंत्री मंडळातील एक मोठे मंत्री सभागृहात आदिवासीना वनवासी म्हणतात आदिवासी हया देशाचा वनवासी नाही तर तो या देशाचा मूळ निवासी आहे.त्यामुळे या पुढे आदिवासींना वनवासी म्हटलेले खपवुन घेतले जाणार नाही .स्वातंत्र्याच्या 75 वर्षा नंतर देखील या देशातील राज्यातील आदिवासींचे प्रश्न हे कायम आहेत त्यां प्रश्नांना सोडविण्यासाठी विधान मंडळात आदिवासी आमदारांनी आवाज उठवलेला नाही त्यामुळे येत्या काळात आदिवासींच्या ज्वलंत विषयांना वाचा फोडण्यासाठी राज्यातील 27 आमदारांनी एकजुटीने आवाज उठविण्याची गरज आहे.असे सांगत
नाशिक जिल्ह्यातील कातकरी समाजाला आपण आदि आदिम समाज म्हणून संबोधत आहोत आज त्यांना राहण्यासाठी घर नाही पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार नाही.अवघ्या 2000 ते 3000 रुपयां मध्ये व्यापारी मुलींना विकत घेऊन जातात ही राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी आदिवासी समाजाच्या इतर गहण विषयांकडे जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की,आदिवासींच्या हक्काच्या हजारो नोकऱ्या बोगस आदिवासींनी बळकावल्या आहेत त्यांना तातडीने सेवेतून कमी करुन त्या जागी आदिवासींना संधी तसेच शासकीय नोकऱ्यातील 55815 इतका अनुशेष तातडीने पद भरतीची प्रक्रिया राबवुन पदे भरण्याची तसेच भगवान बिरसा मुंडा यांचा जीवनपट आणि संघर्षमय आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी केली.
यावेळी आमदार अतुल बेलके, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार सुनिल भुसारा,आमदार माणिकराव कोकाटे,आदीं सह राष्ट्रीय स्तरावरील विविध राजकीय पदाधिकारी,आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यांच्या सह मेळाव्याला राज्यातील हजारो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








