नंदुरबार ! प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथे बंद असलेले भरतीपुर्व सैन्य व पोलीस दल प्रशिक्षण केंद्र त्वरीत सुरु करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री, प्रधान सचिव व आदिवासी विकास विभागाचे नाशिक अप्पर आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग नाशिक, राजुर, जव्हार, कोडेगाव, किनवट, धारणी, गडचिरोली व चंद्रपुर याठिकाणी सैन्य व पोलीस दल भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र वर्षाकाठी तीन सत्रात शंभर मुली व शंभर आदिवासी मुलांना प्रशिक्षण दिले जाते. परंतु नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागामार्फत देण्यात येणारे प्रशिक्षण हे प्रशिक्षणासाठी येणार्या प्रशिक्षणार्थींच्या निवासाअभावी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो आदिवासी मुले व मुली भरतीपुर्व प्रशिक्षणापासून वंचित असून प्रशिक्षणासाठी आलेला निधी दरवर्षी मार्च अखेरीस परत जातो. या गंभीर प्रकरणी त्वरित प्रशिक्षणार्थी मुला-मुलींच्या निवासाच्या जागेची सोय करण्यात यावी. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथे बंद झालेले आदिवासी मुला-मुलींचे सैन्य व पोलिस दल भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र त्वरीत सुरु करण्यासंदर्भात आदेश द्यावेत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी केली आहे.