नंदूरबार l प्रतिनिधी
26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोंबर 2022 रोजी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सव अनुषंगाने नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर येथे यात्रौत्सव भरवण्यात येत असतो. यात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिराचे परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात,
यात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिरात व यात्रेत वयोवृध्द व्यक्ती, स्त्रिया, पुरुष, लहान मुले-मुली इत्यादी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. तसेच बाहेर गावाहून दुचाकी, चारचाकी वाहनांवर आलेल्या भाविकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्याचप्रकारे मंदिराचे परिसरात विविध खेळण्यांचे दुकान, खाण्याचे हॉटेल, स्टॉल, मनोरंजनाचे पाळणे इतर दुकाने असतात.
यात्रोत्सव दरम्यान आलेले भाविक त्यांची दुचाकी, चारचाकी मंदिराचे परिसरात लावल्यामुळे भाविकांची गैरसोय होवून त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो ही बाब लक्षात घेवून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर यात्रौत्सवात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. तसेच याबाबतचे स्वतंत्र आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी निर्गमित केलेले आहेत.
नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर परिसरात 5 ऑक्टोंबर दरम्यान दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर परिसरात त्यांचे दुचाकी व चारचाकी तसेच इतर वाहने जगतापवाडी चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समिती मेन गेट, डी. आर. हायस्कुल ते संतोषी माता मंदिर या मुख्य रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी चारचाकी वाहने पार्किंग करण्यास बंदी करण्यात आलेली आहे.
खोडाई माता यात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांनी त्यांची वाहने भामरे क्लासेस जवळ, GTP महाविद्यालय मैदान, डॉ. राजकुमार पाटील यांचे दवाखान्याचे पूर्वकडील ठिकाणी, BSNL कार्यालयाचे समोर याठिकाणी पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच भाविकांनी त्यांची वाहने मंदिर परिसरात रस्त्यांवर किंवा इतरत्र पार्किंग केल्यास सदर वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.









