नंदूरबार l प्रतिनिधी
येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचा स्वयंसेवक प्रतीक माधव कदम याला नुकताच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार 24 सप्टेंबरला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल येथे महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान होणार आहे.
गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयचा विद्यार्थी प्रतिक कदम याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन समाजसेवा, वन्यजीव सेवा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. त्याच्या या योगदानाची दखल घेत राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली आहे.
यासोबतच 2020-21 मध्ये दिल्ली येथील राजपथावर 26 जानेवारी 2021 ला प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पतसंचलनात महाराष्ट्राच्या वतीने कॉन्टिजेन्ट कमांडर म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्वही केलेले होते. सोबतच दिल्ली येथील युवा सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राचे नेतृत्व करत महाराष्ट्राची परंपरा लावणी नृत्य व बासरी वादन करून सांस्कृतिक प्रतिनिधित्वही केले होते.
कोरोना काळात ज्यावेळेस सर्वसाधारण नागरिक लसीकरणासाठी उत्सुक नव्हते त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात प्रतिकने पथनाट्य ही केले होते. 500 पेक्षा जास्त मास्क दत्तक गाव व बांधकाम मजूर यांना वाटप केले होते.
वृक्षरोपण तसेच वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी जवळपास 500 पेक्षा जास्त सापांना देऊन त्यांना वनांमध्ये सोडण्याचे कामही प्रतीकने केलेले आहे. नंदुरबार परिसरात तो सर्पमित्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याच्या या राष्ट्रपती पुरस्काराच्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन मा.आ .चंद्रकांत रघुवंशी, व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. महेंद्र रघुवंशी, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापक वृंद यांनी समाधान व्यक्त केले.








