नंदुरबार l प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोबर 2022 दरम्यान स्वच्छता ही सेवा या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमे अंतर्गत यावर्षी दृष्यमान स्वच्छता ही संकल्पना घेण्यात आली असून या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविण्यात येतो. त्यानुसार यावर्षी दिनांक 15 सप्टेंबर 2022 दिनांक 1 ऑक्टोबर 2022 दरम्यान स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर शाश्वत स्वच्छतेसाठी दृष्यमान स्वच्छता दिसावी यासाठी जनजागृती करण्यात येऊन विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमात गावातील कचराकुंड्या व असुरक्षित सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करणे, कुटुंब स्तरावर ओला व सुका कचरा संकलन व विलगीकरण याविषयी जनजागृती करणे, कचरा संकलन व विलगीकरणासाठी केंद्र निर्माण करणे, प्लास्टिक सारख्या अविघटनशील वस्तू एकत्रित करणे, एकल प्लास्टिकचा वापराबाबत व त्यांच्या दुष्परिणाम बाबत जनजागृती करणे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची तसेच पाणवठ्याजवळ स्वच्छता करून वृक्षारोपण करणे ,
गावा चा हगणदारीमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी सरपंच संवाद आयोजित करणे ,विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती साठी प्लास्टिक बंदी व स्वच्छता या विषयावर निबंध स्पर्धा, रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्वच्छता ही सेवा या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील सहभाग नोंदवून गावात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी , यासाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच , ग्रामसेवक यांनी गावातील सर्व पदाधिकारी तसेच गावातील सर्व पदाधिकारी ,तरुण मंडळ, बचत गट यांना सहभागी करून घेवून शाश्वत स्वच्छतेसाठी जनजागृती करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व. ) पी. पी. कोकणी यांनी केले आहे.








