नंदुरबार l
प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये नंदुरबार जिल्ह्यातील लम्पी स्कीन डीसिजच्या रोग प्रादुर्भावाची माहिती पशुपालक व इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायतींनी तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखास, पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये जिल्हाधिकारी यांना या अधिनियमाखालील अधिकार वापरण्यासाठी व कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकारी प्रदान करण्यात आले असून या अधिनियमातील कलम चारनुसार पशुपालक, इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा
ग्रामपंचायतींनी रोग प्रादुर्भावाची माहिती त्वरीत नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार अधिकार नसताना लसीकरण प्रमाणपत्र निर्गमित करणे किंवा सदोष लसमात्रा टोचणाऱ्या व्यक्ती, कायद्याशी सुसंगत नाही, अशी कृती करणाऱ्या किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्यास सक्षम प्राधिकाऱ्यांना अडथळा आणणाऱ्या व बाधित पशुधन किंवा शव नदी, तलाव, कॅनॉल व इतर पाण्याच्य स्त्रोतामध्ये टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचे अधिकारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
या कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यासाठी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुखास, सचिवास प्राधिकृत करीत असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.








