शहादा-
दिवसेंदिवस सहकार तत्वावरील प्रकल्प बंद होत चालले आहेत. परंतु वनश्री शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे शेतकर्यांच्या हिताचे प्रकल्प राबवले जात आहेत. राज्यात स्मार्ट प्रकल्पासाठी काही कंपन्या शासनाने सिलेक्ट केल्या त्यात वनश्री अव्वल स्थानी आहे. यावर्षी दीड लाख क्विंटल कापूस खरेदीचे नियोजन असून शेतकरी व सभासद हितासाठी कापूस उत्पादक शेतकर्यांनी चांगल्या प्रतीचा अधिकाधिक कापूस वनश्री जिनिंगला विक्रीसाठी आणावा,असे आवाहन वनश्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले.
नांदरखेडा (ता. शहादा) येथील वनश्री जिनिंग मध्ये वनश्री शेतकरी उत्पादक कंपनीची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी श्री पाटील बोलत होते.यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र दहातोंडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे शहादा शाखाप्रमुख शशिकांत गायकवाड, रमेश बाबू शंकर चौधरी ,योगेश पटेल, दिनेश पाटील, शिवाजी पाटील, दगडू पाटील, अनिल पाटील, यशवंत पाटील आदींसह संचालक मंडळ व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री पाटील म्हणाले की, वनश्रीतर्फे गेल्यावर्षी प्रथमच कापूस खरेदी करण्यात आली त्यात चुका झाल्या असतील परंतु त्यातून शिकायला मिळाले. खेळते भांडवल कमी असल्याने अडचणी आल्या तरीही प्रत्येक शेतकर्याला पै अन पै अदा केली. कुठल्याही शेतकर्याचे पैसे बाकी ठेवले नाही. शहाद्यात सुरू असलेली माती परीक्षण लॅब लवकरच नांदरखेड्यात आणली जाईल. अनुदानासाठी प्रकल्प स्थापन केले जात नसून शेतकरी हितासाठी काम सुरू आहे. शासनाने कामाची दखल घेतली व अनुदान मंजूर केले.
अहवाल वाचन रमेश पाटील यांनी केले त्यात त्यांनी कापूस खरेदी, तसेच कंपनीच्या नफा-तोटा ताळेबंद वाचन केले. त्याचबरोबर कंपनीची स्थावर मालमत्ताही विशद केली.यावेळी राजेंद्र दहातोंडे, शशिकांत गायकवाड, हरी पाटील, प्रदीप लाटे आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे सदस्य, पदाधिकारी यांसह वनश्रीचे सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.








