नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शहादा तालुक्यातील 74 व नंदुरबार तालुक्यातील 75 अशा एकूण 149 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम सुरु आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या 7 सप्टेंबर 2022 रोजीच्या आदेशानुसार माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीतील मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सदस्य पदासह
थेट सरपंच पदाच्या अक्कलकुवा तालुक्यातील 45, अक्राणी 25, तळोदा 55 तर नवापूर 81 अशा एकूण 206 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आल्याने जिल्ह्यात 50 टक्क्यापेक्षा अधिक एकूण 355 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरु झाल्याने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहील.
जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. या निवडणुकीकरिता आचारसंहिता जरी संबंधित मतदारसंघात लागू झालेली असली तरी पोट निवडणुक असलेल्या निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशा तऱ्हेचे कोणतेही धोरणात्मक निर्णय, कोणतीही कृती, घोषणा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, मंत्रीमंडळातील सदस्य, खासदार,
आमदार अथवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यान्वये विनापरवाना सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण गुन्हा आहे याची नोंद घ्यावी. आचारसंहितेचे सर्व उमेदवारांनी, नागरिकांनी, निमशासकीय कार्यालयांनी काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन ) नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.








