नंदुरबार l
धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेतील शिक्षक व कर्मचार्यांच्या रिक्त जागा रिक्त आहे. तसेच माध्यमिक शिक्षकाच्या सर्वच जागा रिक्त असून आंतरराष्ट्रीय शाळेत दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षक विद्यार्थ्यांना मिळत नाही. म्हणुन तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेतील रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात. तसेच शाळेतील विविध समस्या देखील सोडविण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम नुरला पावरा यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, खा.डॉ.हिना गावित. आ.आमश्या पाडवी व निवासी उपजिल्हाधिकारी सुधिर खांदे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील दुसर्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातपुड्याच्या कुशीत धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा सुरु आहे. या आंतरराष्ट्रीय शाळेत दुर्गम व अतिदुर्गम भागातील 1600 हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु सदर आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा असलेल्या तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेतील शिक्षकांसह विविध पदांवरील कर्मचार्यांच्या जागा अद्यापपर्यंत रिक्त आहेत. शाळेसाठी निश्चित असलेल्या शिक्षक, कर्मचारी जागांपैकी केवळ एक ते दोन कर्मचार्यांची नियुक्त असून कमी संख्याबळावर आंतरराष्ट्रीय शाळेचे कामकाज सुरु आहे. त्यात माध्यमिकच्या 15 शिक्षकांच्या जागा असुन एकही शिक्षक नसल्याने सर्वच जागा रिक्त आहे. स्वयंपाकीच्या 25 जागांपैकी 5 कर्मचारी असून 20 जागा रिक्त आहेत. शिपाईच्या 4 पैकी एक कर्मचारी असून तीन जागा रिक्त आहे. वाचमन पदाच्या 6 पैकी देखील एकच कर्मचार्याची नियुक्त असल्याने 5 जागा रिक्त आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय शाळेतील स्वच्छतेच्या कामांसाठी सफाई कामगाराच्या 4 जागा असुन केवळ दोनच कर्मचारी याठिकाणी नियुक्त आहे. आंतरराष्ट्रीय शाळेतील कर्मचार्यांची संख्या पाहता कमी कर्मचार्यांवर आंतरराष्ट्रीय शाळा चालविली जात आहे. प्राथमिकचे 24 शिक्षक हे जिल्हा परिषद शाळांचे असून आंतरराष्ट्रीय शाळेनुसार तोरणमाळच्या शाळेत दर्जेदार शिक्षणासाठी इंग्रजी विषयांच्या शिक्षकांची आवश्यकता असतांना देखील मराठीच्या प्राथमिक शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा असलेल्या तोरणमाळ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजेपयी आंतरराष्ट्रीय शाळेचा कुठलाही फायदा शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना होत नाही. कारण, शाळेतील पदांनुसार कर्मचार्यांची नियुक्ती झालेली नसून शिक्षकांसह अनेक पदे अद्यापपर्यंत रिक्त आहेत. यामुळे तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. त्याचबरोबर तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेत अनेक समस्या असून स्वच्छतेचा देखील अभाव आहे. वारंवारच्या भारनियमामुळे शाळेतील वीज पुरवठा बंद रहात नसल्याने विद्यार्थ्यांसाठी सोलर पॅनलची व्यवस्था करावी, विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर्स व नर्सची नियुक्ती करावी, रुग्णवाहिका कायमस्वरुपी शाळेसाठी उपलब्ध करुन द्यावी, आंतरराष्ट्रीय शाळेच्या दर्जेनुसार इंटरनेट सेवा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम नुरला पावरा यांनी केली आहे.








