बोरद l प्रतिनिधी
येथे एका शेतकऱ्याच्या शेतात सुमारे ३५ पपईच्या वृक्षांची अज्ञात माथे फिरुने कत्तल केली आहे.यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी बोरद येथील शेतकरी गणेश पुना पाटील हे आपल्या सर्व्हे नंबर १५७/१ या शेतात नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता गेले असता आपल्या नित्य सवयी प्रमाणे शेतात लागवड केलेल्या पपईच्या बागाची पाहणी करत होते.
त्यावेळी पाहणीसाठी गेले असता त्यांच्या असे निदर्शनास आले की, शेतामधील मागच्या बाजूला असलेल्या बागेतील साधारणतः ३० ते ३५ पपईच्या झाडांची थडग्यापासून अज्ञात माथे फिरूने कत्तल केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हा प्रकार त्या ठिकाणी पाहून ते हादरूनच गेले. मोठ्या कष्टाने त्यांनी पाच एकर पाच गुंठे या क्षेत्रामध्ये गेल्या मे महिन्यात पपईच्या रोपांची लागवड केलेली होती. ही रोपे पाच महिन्याची झालेली आहेत ह्या रोपांना स्वतःच्या लहान मुलाप्रमाणे आतापर्यंत जपले आहे .परंतू त्यातील काही रोपांची झालेली अवस्था पाहून शेतातच त्यांना रडू कोसळले, भरदार वृक्षांमध्ये परिवर्तित होणाऱ्या रोपांची डोळ्यादेखत झालेली कत्तल त्यांना हताश करून गेली.
त्या अवस्थेत स्वतःला सांभाळत ते गावात आले आणि त्यांनी गावातील लोकप्रतिनिधी यांना घडलेल्या घटनेबाबत सांगितले.व लागलीच त्यांनी मंगेश पाटील यांच्याशी भेट घेत घटनेची माहिती दिली .त्याचबरोबर शेतातील रोपांची परिस्थिती ही दाखवली यानंतर बोरद दुरक्षेत्राला घडलेल्या घटनेची माहिती दिली. बोरद दुरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी तळोदा संपर्क साधत यासंबंधी तळोदा येथे अर्ज देण्यास सांगितले.
गणेश पाटील यांनी तळोदा गाठत तळोदा पोलीस स्टेशनला घडलेल्या घटनेबाबत तक्रारी अर्ज दाखल केला.या अर्जाची लागलीच दखल घेत पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी बोरद दुरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना घडलेल्या घटनेची पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
गेल्या २ वर्षांपूर्वी अशाच घटना शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात घडल्या आहेत .अज्ञात माथेफिरूकडून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पपईच्या झाडांची नासधूस करण्यात आली होते.








