नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील घोगळपाडा येथे शेती हिस्से वाटणीच्या कारणावरुन महिलेस मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील घोगळपाडा येथील मलाबाई कृष्णा पाडवी व त्यांच्या पतीला शांतीलाल नथ्थू पाडवी यांनी तुम्हाला शेतात व घरात कोणत्याही प्रकारचा हिस्सा देणार नाही, असे सांगितले. याबाबत मलाबाई पाडवी व त्यांचे पती समजाविण्यासाठी गेले असता शांतीलाल नथ्थू पाडवी याने कुऱ्हाडीच्या दांडीने डोळ्याजवळ व कानाजवळ मारुन दुखापत केली.
तसेच रोशन शांतीलाल पाडवी यानेही काठीने मारहाण केली व ममताबाई शांतीलाल पाडवी व सोनिया शांतीलाल पाडवी यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत मलाबाई पाडवी यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चौरे करीत आहेत.








