तळोदा l प्रतिनिधी
जिल्ह्याला नैसर्गिक रित्या वनउपज वनस्पतींचे वरदान लाभले आहे, परंतू आपण त्याकडे दुर्लक्ष किंवा बाजारपेठेच्या उपयोगीतेची जाणीव नसल्याने रोजगारासाठी परराज्यात स्थलांतरीत व्हावे लागते. त्यामुळे सातपुड्यातील गतवैभव आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहेत तसे झाल्यास रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल आणि पर्यायाने कुपोषण सारख्या समस्येवर काही अंशी का असे ना नियंत्रण मिळवता येईल.

आजही सातपुड्यातील असंख्य कुटूंबे वनौषधी व फळ झाडाच्या लागवडीतून स्वतः रोजगार निर्माण केला आहे. वातावरणातील होणार्या बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी व बेरोजगारीवर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या पारंपारिक वनउपज झाडांची लाकड केली पाहिजेचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी व्यक्त केले
केंद्र शासनकडील विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा व उप वनसंरक्षक, मेवासी वनविभाग, तळोदा मार्फत दि.17 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट रोजी दरम्यान डी.एस.के.रेसिडेन्सी, नंदुरबार येथे अनुसूचित जमाती च्या लाभार्थ्यांना बांबू व मोहू वनउपज मालावर प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे. या प्रशिक्षित दरम्यान झिरी ता.तळोदा येथील सातपुडा ग्रीन व्हेली प्रोड्युसर कंपनीला भेट देऊन बांबू लागवडीचे महत्व व बांबूपासून बनविण्यात येणार्या विविध वस्तू व त्यातून मिळणारा रोजगार याची माहिती देण्यात आली.
जि. प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, उप वनसंरक्षक लक्ष्मण पाटील, सहाय्यक वनसंरक्षक मनोज रघुवंशी, सहाय्यक वनसंरक्षक गणेश गांगुर्डे, जि.प.सदस्य प्रताप वसावे, वनक्षेत्रपाल आर.जी.लांमगे, कंपनीच्या सीओ निशा वळवी, जगदीश वळवी, सुधाकर वळवी, चेतन वळवी आदी उपस्थित होते.
वन विभागामार्फत सुरू असलेल्या बांबू व मोहू वनउपज मालावरील प्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेला तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील 75 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहे. यात तीन दिवस मोहूच्या फुलांपासून आठ प्रकारचे खाद्यपदार्थ बनविण्याचे व तीन दिवस बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सातपुड्यात पाणी अडवा पाणी जीरवा ची मोहिम अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून वेळीच यावर लोकसहभागातून उपाय योजना करणे आवश्यक आहे कारण दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त बांबूची लागवड केल्यास सातपुड्यातील मातीची होणारी धुप थांबवता येईल व त्यातून रोजगार देखील मिळेलचे मत व्यक्त केले.
उपवन संरक्षक लक्षण पाटील यांनी वन विभागाने सुरू केलेल्या प्रशिक्षणात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन वनसंवर्धनाला प्रोत्साहन देण्याचे आवहान केले तसेच प्रताप वसावे यांनी कोरोना काळातील कृत्रिम ऑक्सीजनसाठी निर्माण झालेल्या समस्येची उदाहरणे देते युवांनी सातपुडा हरित अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.








