धडगाव l प्रतिनिधी
मनवाणी ता.धडगाव येथे कडक बंदोबस्तात बैलपोळा साजरा करण्यात येणार आहे. मनवाणी येथे साजरा होणारा बैलपोळा हा अवघ्या सातपुड्याचा उत्सव असून यासाठी पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत बैलपोळ्यासाठी मनवाणीत युवक व जबाबदार व्यक्तींच्या २५ कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याशिवाय ५० स्वयंसेवकही नेमण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडून १०० जणांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.
सर्जाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनवाणीत कोरोना कालावधी वगळता परंपरेनुसार बैलपोळा साजरी होत आला आहे. या परंपरेतच यंदाचाही बैलपोळाही साजरा होत आहे. या उत्सवासाठी मनवाणीत ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठकही घेण्यात आली.
या बैठकीत रामा वळवी, पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, गुलाबसिंग राहसे, गोपनीय शाखेचे पुष्पेंद्र कोळी यांच्यासह मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बैलांची मिरवणूक काढण्यासाठी एक बँड पार्टी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
तर अन्य नृत्य कार्यक्रमासाठी पारंपरिक ढोलची वाजवण्याचा निर्णय घेतला असून यातून संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. बैलांची मिरवणूक ही जि.प. शाळेपासून हनुमान मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. या उत्सवासाठी धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.
या कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्व नियोजन केले आहे. या नियोजनानुसार १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस उप निरीक्षक, ३५ पोलीस कर्मचारी तर गृहरक्षक दलाचे ६० कर्मचारी असा एकुण ९८ जणांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.
त्यामुळे शांतता व सुव्यवस्था नियमांचे उल्लघन टळणार आहे. ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाच्या या निर्णयामुळे उत्सवात सहभागी होणार्या नागरिकांना सुरक्षेचा आधार मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय धावपटू भगतसिंगचा होणार सत्कार
असली ता.धडगाव येथील रहिवासी तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर धावण्याच्या शर्यतीत नंदुरबार जिल्हा व महाराष्ट्राचे नाव उंचावणारा भगतसिंग वळवी याचा सातपुड्याच्या वतीने शाही सत्कारही करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त मनवाणीच्या हनुमान मंदीरात आदल्या दिवसांपासूनच विविध पूजेचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. यासाठी तडवी काकड्या महाराज हे परिश्रम घेत आहेत.








