नंदूरबार l प्रतिनिधी
एकीकडे अवघा देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना आणि फ्लायओव्हर सी लिंक व स्काय वाकच्या जमान्यात नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात सातपुड्याच्या दुर्गम भागांत नदीवर पूलच नसल्याने(स्कूल बस वैगेरे लांबची गोष्ट) आधीच शिक्षणापासून वंचित असणाऱ्या हजारो आदिवासी विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात शाळेत कसे जायचे हा वर्षानुवर्षे प्रश्न होता.
नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार पोलिसांनी निसर्गाचे हे आव्हान स्वीकारले. कोणत्याही मदतीची वाट न पहाता पोलीसांनी ४ दिवसात शाळेकडे जाणाऱ्या नदीवर पूल उभारुन आदिवासींना खऱ्या अर्थाने शिक्षणाचे स्वातंत्र्य प्राप्त करुन दिले आहे. काल्लेखेतपाडा ता. धडगाव येथे शिक्षण सेतू तयार केला.याबाबत पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत पोलीस अधीक्षकांच्या सत्कार करण्याचा ठराव करण्यात आला.
या कामगिरीमुळे पोलीस दलाचे जनसामान्य नागरिकांमध्ये आपुलकी निर्माण होऊन वेगळीच प्रतिमा तयार झाली आहे.शहादा तालुक्यातील गणोर येथील करणसिंग शंकर तडवी हे प्राथमिक शिक्षक म्हणून झुम्मट ता.धडगांव येथे आहेत.शिक्षकसेतू तयार केल्या नंतर शिक्षकाने व्यक्त केलेल्या भावना सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
करणसिंग शंकर तडवी यांनी व्यक्त केलेल्या भावना जशाच्या तश्या खालील प्रमाणे आहेत.

पोलीस म्हटला म्हणजे एक आक्रमक, शिस्तबद्ध,ज्याच्या समोर जायला आपणांस भीती वाटते अशीच आजपर्यंत आपली मनोधारणा झालेली असते. आणि कायदाव्यवस्था सुव्यवस्थित चालण्यासाठी त्याने तसे असलेच पाहिजे यांत शंकाच नाही. पण पोलिस हा माणुस देव म्हणुन समोर आला. आपल्यातील देवत्वाची प्रचीती त्याने दिली. ती कोरोना महामारीत केलेल्या अविरत २४ तास मानवसेवेमुळे. कोरोनामुळे माणसं दगावू नये म्हणुन हा देवमाणसं गावा-गावातील, शहरा-शहरातील ,नगर-महानगरातील चौफुलीवर डोळ्यांत काजळ घालुन.
आराम-हराम त्यागुन पहारा देत होता. ज्यांचा जीव वाचावा म्हणुन तो हे सर्व करत होता. त्याच काही बेशिस्त,सुसाट, कमबुद्धी लोकांच्या शिव्यांचा वर्षावही तो आपल्या अविरत श्रमाने दुर्बल झालेल्या पण देशहितैषी,आत्मविश्वासी,परमार्थी मस्तिष्कावर सहत होता. कोणताच थकवा नसल्याच्या अविर्भावात. आणि हे फक्त भारतातच घडू शकते. कारण भारतात जगणे कठिण आणि मरण सोपे करुन ठेवलयं या देशातील आत्मविश्वास हरवलेल्या लोकांनी. सुसाट लोकांनी, बेशिस्त लोकांनी.
त्यामुळे कोरोना महामारीत भारतीय लोकांचा जीव वाचावा म्हणुन पोलिसांनी ऊन,पाऊस, वादळ-वारे,थंडी याची तमा न बाळगता उघड्या-नांगड्यावर बसुन अविरत केलेली सेवा ही जेव्हा-केव्हा भारतात कोरोना महामारीचा इतिहास लिहिला जाईल.तेव्हा पोलिसांच्या या मानवतावादी सेवेचा उल्लेख स्वर्णिम अक्षरात लिहिला जाईल.
हे सर्व होत असतांनाच सोने पे सुहागाच अशी एक गोष्ट सातपुडा पर्वतातील नंदुरबारसारख्या अतीदुर्गम जिल्ह्यात घडली आहे… मागे आम्ही शहादा येथील डोंगरगांव चौफुलीवर भगवान बिरसा मुंडा चौक येथे भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन उलगुलान दिन म्हणुन साजरा करत असतांना चौफुलीवर १०/१२ पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते. त्यांच्यात आपांपसात चर्चा चाललेली होती. ती नंदुरबारचे पोलिस अधिक्षक आदरणीय पी.आर.पाटील साहेब यांची. त्यांच्यातील संवेदनशील मनाची. त्यांच्या मानवतावादी आचार-विचार यांची. मी जरा अतीचौकस असल्याने सहजच त्या पोलिसांच्या आणखीनच जवळ गेलो.
त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा मला कळले कि नंदुरबार जिल्ह्यात/ त्यांच्या अधिकार क्षेत्रातील कोणत्याही पोलिस कर्मचारीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच पोलिसांनी आपापल्या क्षमतेनुसार त्या मयत पोलिसाच्या परिवारास लागलीच मदत करण्याचे नियोजन केलेले आहे. यामुळे दु:खांचा डोंगर कोसळलेल्या त्या परिवारास थोडाफार का असेना,पण आधार मिळावा. आणि हे सारे नियोजन नंदुरबार जिल्हा पोलिस अधिक्षक आदरणीय पी. आर. पाटीलसाहेब यांच्या मानवतावादी मस्तिष्काने निर्णय घेवुन तशी अंमंलबजावणी करण्यास सुरुवात केलेली आहे.
ऐकुन मला हायसे वाटले. त्यांच्याबद्दल आदर वाढला. इतर क्षेत्रातही अशा प्रकारचे मानवतावादी आचार-विचार बळावणे काळाची गरज असल्याचे मला मनोमन वाटू लागले.
पण याहीपेक्षा आदरणीय पी. आर. पाटील साहेब यांच्याबद्दल अतीआदर माझ्या मनात तेव्हा वाढला. जेव्हा सातपुडा पर्वतातील धडगांव तालुक्यातील काल्लाखेतपाडा येथील देशाची भविष्य असलेले शालेय विद्यार्थी नदी-नाल्यातुन आपला जीव धोक्यात घालुन शाळेत पुराच्या पाण्यात पायपीट करत शाळेत ये-जा करुन शिक्षणाचे धडे घेत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि हा माणुस ती बातमी वाचुन बेचैन झाला.
आपल्या सोबत्यांना सोबत घेवुन या अतीदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या स्वर्णिम भविष्य मार्गातील हा अडथळा दुर करण्यासाठी पुढे सरसावला. शिक्षणसेतू बांधण्यासाठी पुढे सरसावला. त्या विद्यार्थ्यांच्या जीवघेणा प्रवास सुखकर करण्यासाठी आपल्या सोबत्यांसोबत काल्लाखेतपाडा येथे पोहचुन त्या नदी-नाल्यावर पुल बांधुन रस्ता तयार केला. एकीकडे आदिवासी विकासाच्या नावाने आलेला अफाट निधी केवळ कागदोपत्रीच दाखवुन आपलेच जीवन कुबेरपती बनविण्यातच व्यस्त असलेली काही कंत्राटदार मंडळी आणि दुसरीकडे आपल्या स्वत:च्याच कामाचा अतीव्याप असुनही केवळ काल्लाखेतपाडा येथील विद्यार्थ्यांचा शाळेतील ये-जा करण्याचा जीवघेणा प्रवास पाहुन काळजातुन हादरुन त्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी क्षणाचाही विलंब न लावता पुढे सरसावलेला देवमाणुस आदरणीय पी.आर. पाटीलसाहेब. जबाबदारी आहे म्हणुन काम करणे यांत मोठेपणा नाही.
पण आपल्यातील संवेदनशील काळजाने नरकयातना पाहुन विचलित होणे आणि मानव उत्थानासाठी आपले सर्वस्व त्यागणे यांत देवपण आहे. आदरणीय पी.आर.पाटीलसाहेब यांच्यात मी देवच पाहतो. देव कोणी पाहिला ? पण अशा माणसांच्या रुपातच,कार्यातच देव आपले कार्य करत असतो. मला स्वत:ला असे वाटते. कि केवळ आदिवासी नामाचा जाप करुन. आदिवासी समाजावर पुस्तक लिहुन. आदिवासी समाजावर सिनेमे काढुन. आदिवासी समाजाचे आम्हीच खरे मसीहा आहे असा बहुरुपी देखावा करुन. जास्तीत जास्त तुम्हाला अनेकानेक पुरस्कार मिळू शकतील. तुमच्या नावाला चकाकी मिळू शकेल. तुमच्याबद्दल लोकांच्या मनात आदर वाढेल . तुमचा संसार सुखमय होईल.
पण आदिवासी समाजाचा उध्दार मात्र तेव्हाच होईल. जेव्हा आदरणीय पी.आर.पाटीलसाहेब यांच्यासारखे आदिवासी नरकयातना पाहुन. काळीज पाझरेल आणि कल करे सो आज कर व आज करे सो अभी या वाक्याची शत-प्रतिशत अंमंलबजावणी होईल. नाही तर दुर्गम भागातील आदिवासी कालही अंधारात होता. आजही अंधारात आहे आणि उद्याही अंधारातच असेल. त्या कवीच्या त्या ओळीनुसार. ये आज़ादी झुठी है. देश की आधी आबादी भुखी है।








