नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या ४८ तासापासून पावसाची संततधार सुरूच असल्याने नदी नाल्यांना पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक विभागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतांमध्ये पुराचे पाणी आल्याने पीक पाण्याखाली आले आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांना जोडणाऱ्या लहान फरशी पुलावरून पाणी जात असल्याने दळणवळण ठप्प झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेती कामांना ब्रेक लागला आहे. निंदणी, कोळपणी, औषध फवारणी, पिकांना खत देणे इत्यादी कामे खोळंबल्याने पिकांची वाढही खुंटली आहे. पावसाच्या संततधारेमुळे धरणे व नदी नाल्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. असला तरी अति पाऊस पिकांसाठी धोकादायक ठरत असल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.








