नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील मोठे कडवान शिवारातील पाझर तलावात अर्जून वाघीरे (वय ५५ ) या व्यक्तीचा आंघोळीसाठी गेले असतांना पाय घसरून खोल पाण्यात तोल गेल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मयताचा मुलगा मोलामजी अर्जुन वाघीरे यांनी दिलेल्या खबरीवरून विसरवाडी पोलिसांनी सीआरपीसी १७४ प्रमाणे मृत्यूची नोंद केली आहे.
काल संध्याकाळी गावकऱ्यांनी त्यांच्या मृतदेहाचा शोध घेतला; परंतु खोल पाण्यामुळे मृतदेह मिळाला नव्हता. आज सकाळी अर्जून वाघीरे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने. विसरवाडी पोलीस प्रशासन व गावकर्याच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वळवी, पोलीस नाईक राजू कोकणी, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र हिरे यांनी पाहणी करून पुढील कार्यवाही केली.
अर्जून वाघीरे हे गेल्या अनेक वर्षापासून मोठे कडवान गावात आपल्या परिवारासह स्थायिक झालेले होते. गावात गुराख्याचे काम करत होते. त्यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अर्जून वाघीरे यांच्या पश्चात्य पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.