नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास नवापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विसरवाडी गावाजवळील सरपणी नदीवरील कच्चा पूल पुराच्या पाण्यामुळे पुन्हा नांदुरुस्त झाल्याने धुळे व सुरत कडे जाणारी अवजड वाहतूक ठप्प झाली आहे.
पुलावरून पाणी जात असल्याने विसरवाडी पोलिसांद्वारे रात्री साडेनऊ वाजेपासून वाहतूक बंद करण्यात आली होती.
सदर पूल पुराच्या पाण्यात चौथ्यांदा नांदुरुस्त होऊन वाहतूक बंद होण्याची वेळ आली आहे. स्थानिक नागरिकांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या जे एम म्हात्रे कंपनीला सुरुवातीपासूनच मोठे पाईप टाकून ठोस उपाययोजना करण्याचा सल्ला दिला होता.
मात्र ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळे चौथ्यांदा वाहतूक बंद झाल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता तरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुराच्या पाण्यात पुलाचा काही भाग वाहून गेल्याने दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करण्यास काही काळ लागणार आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी विसरवाडी पोलिसांद्वारे बंदोबस्त लावण्यात आला आहे.








