चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर
तळोदा शहरात डासांचा प्रतिबंधक औषधी फवारणी करावी याबाबतचे निवेदन तळोदा येथील भोई गल्ली, कुंभार गल्लीतील रहिवाशांकडून तळोदा नगर परिषद मुख्याधिकारी सपना वसावा यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा शहरात मागील आठ ते पंधरा दिवसांपासून पाऊस सुरु असल्याकारणाने संपूर्ण तळोदा शहरात ठिकठिकाणी पाणी साचले असून सर्वसामान्य नागरिकांना अंत्यत त्रास झाला आहे. डास निर्मूलनासाठी औषध फवारणी करावी. शहरात दिवसेंदिवस (डेंग्यू डासांचा) प्रादुर्भाव होत असून प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे व औषध फवारणी केली पाहिजे. जेणेकरून तळोदा शहरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात जाणार नाही.
तळोदा शहरात प्रतिबंधक औषधांची फवारणी केली तर नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी भावना व्यक्त केली जात आहे. पण तळोदा शहरातील वस्तीमध्ये फवारणी करणे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष दिसून येते.
तळोदा शहरात डेंग्यू मलेरिया, हिवताप, साथीचे आजार हे वाढण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. आपण आपल्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण तळोदा शहरात डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी असे निवेदन तळोदा येथील भोई गल्ली, कुंभार गल्लीतील रहिवाशांकडून तळोदा नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
या निवेदनावर अमोल वानखेडे, सचिन तावडे, राहुल शिवदे, निरज रामाळे, धिरज साठे, तुषार जोहरी, गोलू जावरे, संतोष वानखेडे, ललित ढोले, बंटी शिवदे, गणेश शिवदे, धनलाल शिवदे आदींच्या सह्या आहेत.








