नंदुरबार l प्रतिनिधी
सर्व सामान्याच्या हिताचे हे सरकार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. धडगाव व नंदुरबार नगरपालिकेला २० कोटी रुपयांच्या निधी देण्यात येईल त्याचप्रमाणे धडगाव पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मंजुरी दिली.
शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज रविवारी सायंकाळी पाठिंबा दिला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. काल रविवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नंदुरबार पालिका,धडगाव नगरपंचायत,सेना जि.प सदस्य त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा पत्रे दिली आहेत.
शिवसेनेच्या ४० आमदारांच्या पाठिंब्याने राज्यात गेल्या महिन्यात राजकीय घडामोडी होऊन सत्ता परिवर्तन होऊन मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची वर्णी लागली. आमदारांपाठोपाठ खासदारांनी देखील एकनाथ शिंदेंना पाठींबा दर्शविला.राज्यातील अनेक महानगरपालिका,नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत आहेत असे असतांना नंदुरबार जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात कोण कोण सामील होणार याची उत्सुकता लागलेली होती. शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागले होते.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निरीक्षक नंदुरबारात आल्यावर त्यांनी माजी आ.चंद्रकांत यांच्या समर्थक,कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी शिंदेंना पाठिंबा देण्याचे एकमत झाले होते.
आज रविवारी सायंकाळी मुंबई येथे रघुवंशी गटातील नंदुरबार नगरपालिका,धडगाव नगरपंचायत,नंदुरबार पंचायत समिती, जि.प पदाधिकारी व सदस्य त्याचप्रमाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील जवळपास हजारो समर्थक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याची पत्रे देण्यात आली.
कार्यकर्त्यांनी दणाणले नंदनवन
शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यातील अनेक स्थानिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली. प्रसंगी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो,धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या विजय असो’ अशा घोषणा घेण्यात आल्या.
यावेळी नंदुरबारच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी, नंदूरबार पालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, धडगाव येथील विजय पराडके यांच्यासह नगरपंचायतीचे नगरसेवक आदींनी शिंदे गटाला पाठिंबा दिला.