नंदूरबार l प्रतिनिधी
सेंधवा ते विसरवाडी राष्ट्रीय महामार्गावरील प्रकाशा ते शहादा दरम्यान रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या मार्गावरील प्रकाशा येथील तापी आणि गोमाई नदी वरील पुलांची दुरावस्था झाली आहे.
पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.यात दररोज अपघात होत असतात या संदर्भात सर्व पक्षीय नेते व प्रकाशा ग्रामस्थ यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर संबधित विभागाने प्रकाशा येथील तापी नदी पुलावरील खड्डे माती व मुरुमच्या साह्याने भरण्यास सुरवात केली आहे. असे असले तरी आज भव्य आंदोलन करण्यात येणार आहे.
मातीच्या साह्याने खड्डे भरले जात असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल होऊन वाहने फसत असल्याची परिस्थिती आहे.त्यामुळे
वाहतूक कोंडी होत आहे. योग्य शास्त्रीय पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती होण्याची अपेक्षा असताना थातूरमातूर काम करून वेळ मारून नेली जात आहे.
सदर रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम व्यवस्थित व्हावे या मागणीसाठी आज सकाळी १० वाजेला रास्ता रोको आंदोलनावर नागरिक ठाम असून आंदोलनात प्रकाशा परिसरातील शेकडो वाहनधारक आणि नागरिक सहभागी होणार आहेत.